दिव्याखाली अंधार! विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर 'मुंबई'चे स्पेलिंग चुकले, 1.64 लाख पदव्यांवर Mumbai ऐवजी Mumabai छापले
Mumbai University : पदवी प्रमाणपत्र तयार करण्याचं काम विद्यापीठाने एका खासगील कंपनीला दिलं होतं. आता त्या कंपनीला काळ्या यादीत टाका अशी मागणी युवा सेनेने केली आहे.

मुंबई : नेहमी काही ना काही कारणांवरून चर्चेत येणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या एका चुकीमुळे आता लाखो पदवीधारक तणावाखाली आल्याचं दिसून येतंय. विद्यापीठाच्या 1.64 लाख पदवी प्रमाणपत्रावर मुंबई या शब्दाचेच स्पेलिंग चुकल्याने विद्यापीठावर नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी किंवा पुढील शिक्षणासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ जानेवारी महिन्यात झाला. दीक्षांत समारंभानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या पदवी प्रमाणपत्रावर 'युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई' नावामध्ये 'Mumbai' ऐवजी 'Mumabai' छापण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. तब्बल एक लाख 64 हजार पदवी प्रमाणपत्रावर अशाच प्रकारे चुकीची छपाई स्पेलिंगची करण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामुळे ही पदवी प्रमाणपत्रं विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी किंवा भविष्यात इतरत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
पदवी प्रमाणपत्र तयार करण्याचं काम मुंबई विद्यापीठाने एका खाजगी आस्थापनाला दिले होते. त्यांच्याकडून ही मोठी चूक झाली आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनाला काळ्या यादीत टाकण्याची मागणी युवा सेना सिनेट सदस्यांनी केली. सोबतच राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे मुंबई विद्यापीठात आठवड्याला येत असताना मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराकडे त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे.
यंदा 1.64 लाख पदवी प्रदान
मुंबई विद्यापीठा्चया दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील 1 लाख 64 हजार 465 स्नातकांना पदव्या प्रदान आल्या. यामध्ये 85 हजार 511 मुली तर 78 हजार 954 मुलांचा समावेश आहे. यामध्ये पदवीपूर्व स्नातकांची संख्या 1 लाख 39 हजार 184 एवढी असून पदव्युत्तरसाठी 25 हजार 281 स्नातकांचा समावेश आहे.
पदवीपूर्व स्नातकांमध्ये 70 हजार 523 एवढ्या मुलींचा समावेश असून, 68 हजार 652 मुलांचा समावेश आहे. पदव्युत्तर स्नातकांमध्ये 14 हजार979 एवढ्या मुलींचा समावेश असून 10 हजार 302 एवढ्या मुलांचा समावेश आहे. विद्याशाखीय पदव्यांनुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 86 हजार 601, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 47 हजार 14, मानव्यविज्ञान विद्याशाखा 22 हजार 583 आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी 8 हजार 267 एवढ्या स्नातकांचा समावेश आहे.
त्याचबरोबर विविध विद्याशाखेतील 401 स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी) पदवी प्रदान करण्यात आली. ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी 230, वाणिज्य व व्यवस्थापन 80, मानव्यविज्ञान विद्याशाखेसाठी 51 आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी 40 एवढ्या पदव्यांची संख्या आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या 18 विद्यार्थ्यांना 20 पदके मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आली. यामध्ये 15 मुली व 3 मुलांचा समावेश आहे.
ही बातमी वाचा :
























