कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी युनिव्हर्सल पास! रेल्वे, मेट्रो, मोनो, बस आणि मॅालसाठीही उपयोगी ठरणार
कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी युनिव्हर्सल पास मिळणार आहे. हा पास रेल्वे, मेट्रो, मोनो, बस आणि मॅालसाठीही उपयोगी ठरणार आहे.
मुंबई : लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरू करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येणार आहेत. या पासवर क्यूआर कोड असणार आहे. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू शकणार आहे.
कसा मिळवता येणार पास?
- राज्य सरकारकडून एक वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. ही वेबसाईट को-विनशी लिंक केली जाणार आहे. यामुळे व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासता येणार आहे.
- ज्या व्यक्तीला पास काढायचा आहे, त्याने या वेबसाईटवर आपला मोबाईल क्रमांक एंटर करुन, मोबाईलवर आलेला ओटीपी वेबसाईटवर समाविष्ट करायचा आहे.
- त्यानंतर व्यक्तीला आपले लसीकरण प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड करायचे आहे.
- तसेच आपला एक फोटो वेबसाईटवर अपलोड करायचा आहे.
- व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्यूआर कोड पास (युनिव्हर्सल पास) जनरेट होईल.
- हा पास रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवून, तिकीट किंवा पास मिळवता येणार आहे.
- ज्या नागरिकांकडे इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही किंवा ज्यांना वेबसाइट हाताळता येत नाही, अशा नागरिकांसाठी मुंबई महापालिकेत हेल्प डेस्क सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी नागरिक आपली कागदपत्रे दाखवून युनिव्हर्सल पास मिळवू शकतात.
अस्लम शेख काय म्हणाले?
लसीचे दोन डोस झालेल्यांना जे क्युआर कोड दिले जातील. ते क्युआर कोड सर्वत्र वापरले जाऊ शकतील. विशेषत: महाराष्ट्रभर प्रवासासाठी ते उपयोगात येतील. रेल्वेसाठी वेगळा, बससाठी वेगळा असा क्यूआर कोड असणार नाही. दोन डोस झाल्याचं सर्टिफिकेशन म्हणजे हे क्यूआर कोड असतील.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील. तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी, असे आवाहन केले.