Uday samant : विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी, आदित्य ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा हिशेब उदय सामंतांनी मांडला!
Uday Samant On Aditya Thackeray : राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या लंडन दौऱ्यावर ठाकरे गटाने नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. त्याला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: मी उद्योगमंत्री म्हणून स्वतःच्या खर्चाने लंडनला गेलो आणि 13 मिटिंग घेतल्या, पण आमच्यावर जे आरोप करतात त्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्च किती झाला हे कधी जाहीर करणार असा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केला आहे. मंत्र्यांच्या परदेशवारीवरून आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्या दाओस दौऱ्याचा खर्चच समोर मांडला.
उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्या दाओस दौऱ्याववेळी झालेल्या खर्चाची मांडणी केली आणि त्यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे हे दाओस दौऱ्यावर असताना त्यांच्या चहापान आणि भोजनावर 1 कोटी 5 लाख 50 हजार 692 रुपये खर्च आल्याचं सांगितलं. तर आदित्य ठाकरे यांच्या निवासासाठी 2 कोटी 40 लाख 15 हजार रुपये खर्च आल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरे यांच्या विमान खर्चासाठी 44 लाख 63 हजार तर वाहन व्यवस्थेसाठी 67 लाख 19 हजार रुपये खर्च आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.
मी माझ्या खर्चाने लंडनला गेलो...
उदय सामंत म्हणाले की, "लंडनमध्ये म्युझियममध्ये असलेली वाघनख भारतात आणण्यासाठी करार झाला. मी मागे देखील लंडन दौऱ्यावर असताना अनेकांनी राजकारण केले. मुख्यमंत्री यांचा दौरा 26 तारखेला ट्विट केल्यानंतर रद्द झाला असे काहींनी म्हटले. 25 तारखेला भूषण गगराणी यांनी कळवल होते, यांचे ट्विट 26 तारखेला झाले. काही लोकांना माहीत नव्हते मी लंडनला जात होतो तर कुणाच्या खर्चाने जात होतो. मी उद्योगमंत्री म्हणून स्वतःच्या खर्चाने गेलो आणि 13 मिटिंग घेतल्या."
उदय सामंत पुढे म्हणाले की, "आदित्य ठाकरे यांचा 2022 चा दौरा होता तेव्हा त्यांचा, नितीन राऊत आणि ओएसडी यांचा खर्च कुणी केला यांचं उत्तर त्यांनी दिले नाही. त्याचे पेपर माझ्याकडे आहे. स्वतः सरकारी पैशातून जायचं आणि दुसऱ्याच्या दौऱ्यावर बोलायचे असं सुरू आहे. तेव्हा उद्योग विभागाच्या दौऱ्यावर ऊर्जा मंत्री, पर्यटन मंत्री का गेले होते? आपण काय केलं हे लोकांना सांगायचे नाही."
देशातली पहिली AI पॉलिसी घेण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे. AI पार्क आणि क्लस्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला असं उद्योगमत्री उदय सामंत म्हणाले.
अजित पवारांनी खोके घेतले का?
काही लोकांना सायबर युनिव्हर्सिटी तयार करण्यासाठी जागा हवी. काही लोक म्हणतात आम्ही खोके घेतले. मग अजितदादा देखील खोके घेऊन आलेत का? हे त्यांनी जाहीर करावे असं उदय सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचे काम काही लोक करत आहेत. कोरोना काळात यांनी मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले, ते आज मुख्यमंत्र्यांवर बोलत आहेत. काही जण किती वाजता उठतात यावर बोलायला ह.वं मुख्यमंत्री किती काम करतात यांना माहीत नाही
इतके मुख्यमंत्री झाले, पण त्यांच्या काळात वाघनखं आणण्याचा निर्णय झाला नाही, ज्या लोकांनी उदयनराजे यांच्यावर शंका उपस्थित केली, त्यांनी वाघनखं बघितली नाहीत असं उदय सामंत म्हणाले. ते म्हणाले की, आम्ही देखील खालच्या भाषेत टीका करू शकतो. पण एकनाथ शिंदे म्हणालेत म्हणून शांत बसलो. आज माझ्यासोबत राहुल कनाल आहे त्यामुळे सर्वाना काय ते माहीत आहे.
अजितदादा यांच्यावर आदित्य ठाकरे बोलत नसल्याचं सांगत ते का बोलत नाहीत हे मला समजत नाही असं उदय सामंत म्हणाले.
ही बातमी वाचा: