Corona Update | पाच हजारांचं रेमडेसिवीर इंजेक्शन 20 हजारांना विकण्याचा प्रयत्न, मीरा रोडमधून दोघांना अटक
अटक केलेल्या आरोपींकडून रेमडेसिवीरची चार इंजेक्शन सापडली, ती इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. यातील एकजण मेडिकलमध्ये काम करणारा आहे.
पालघर : मीरा रोड पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार इंजेक्शनही जप्त करण्यात आले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन अत्यावस्थेत असणाऱ्या कोरोना रुग्णावर उपचारासाठी वापरली जातात. मात्र या इंजेक्शनचा साठा करुन काळाबाजार होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.
मीरा रोडमधील एका कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाने या इंजेक्शनसाठी धावपळ सुरु केली होती. त्यावेळी एका व्यक्तीने या एका इंजेक्शनसाठी तीस हजार रुपयांची मागणी केली. परंतु चार इंजेक्शन हवी असल्याने तडजोडीनंतर एका इंजेक्शनचे 20 हजार याप्रमाणे चार इंजेक्शनचे 80 हजार ठरले. त्या नातेवाईकाने मीरा रोड पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी साईबाबानगर भागात शुक्रवारी सायंकाळी सापळा रचला आणि हे औषध विकायला आलेल्या राल्फ टोनी रॉड्रीक्स आणि सोनू डॅनियल दर्शी या दोघांना अटक केली.
अटक केलेल्या आरोपींकडून रेमडेसिवीरची चार इंजेक्शन सापडली, ती इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. यातील सोनू हा औषध विक्रीच्या दुकानात काम करणारा आहे. त्यांने ही इंजेक्शन मुंबईवरुन आणल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. या दोघांशिवाय त्यांच्यासोबत आणखी कोण आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनची मुळ किंमत 5,400 रुपये आहे. मात्र अत्यवस्थेत असणाऱ्या कोरोना रुग्णांना ही इंजेक्शन आवश्यक असल्याने याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
Remdesivir Medicine | रेमडेसिवीरचा काळाबाजार, चार इंजेक्शनसाठी मागितले 80 हजार रुपये, दोघांना अटक