(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नार्कोटिक्स युनिटचे अधिकारी सांगत घरावर छापेमारी करत एक लाख चोरले; दोन आरोपी अटकेत
नाझियाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांविरोधात कलम 170, 171, 419, 420, 452 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलिसांनी काही तासातच सरफराज शब्बीर अहमद अंसारी उर्फ पापा आणि अमोल धर या दोन आरोपींना अटक केली आहे.
मुंबई : अँटी नार्कोटिक्स एजन्सी मुंबईत खूप सक्रिय झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कारवाई खूप वेगवान सुरु आहे. याचाच फायदा घेत काही लोकांनी स्वत:ला अँटी नार्कोटिक्स युनिटचे अधिकारी म्हणत एका घरावर छापा टाकला आणि घरात एक लाखाहून अधिक पैसे लंपास केले. रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी बँकेतून हे पैसे आणले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
माहिम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाझिया अब्दुल रहीम शेख या 14 तारखेच्या रात्री आपल्या कुटुंबासोबत घरात झोपल्या होत्या. अचानक पहाटे 4 वाजेच्या सुमारास काही लोकांनी दरवाजा ठोकला. नाझियाने दरवाजा उघडताच तोंडावर मुंबई पोलिसांचा लोगो असलेला मास्क घातलेले दोघे जण उभे होते. दोन्ही आरोपींनी नाझियाला सांगितले की ते नार्कोटिक्स युनिटमधून आले आहेत आणि त्यांना या घरात ड्रग्सची तस्करी केल्याचा संशय आहे.
त्यामुळे घाबरलेल्या नाझियाने दोघांना घरात येण्याची परवानगी दिली. सर्वप्रथम त्यांनी नाझियाचा मोबाईल ताब्यात घेत असे सांगितले की, संपूर्ण कारवाई होईपर्यंत फोन त्यांच्याकडेच राहील. त्यानंतर संपूर्ण घराची त्यांनी तपासणी सुरु केली. घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्यांनी शोध घेतला, मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. शेवटी दरवाजाच्या मागील बाजूस लटकलेल्या नाझियाच्या पर्सवर त्यांची नजर पडली. त्यांनी पर्स उघडली तर त्यात एक लाख रुपये त्यांना सापडले.
त्यानंतर दोन्ही आरोपींनी नाझियाला सांगितले की, आम्ही दोघेही पैसे घेऊन खाली जात आहोत. पोलिसांची गाडी खाली उभी आहे, त्यात आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत. तुम्ही तयारी करुन खाली या आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या पैशांची तुम्ही माहिती द्या आणि पैसे परत घेऊन जाऊ शकता. घाबरून नाझिया पटकन तयार होऊन खाली आली. मात्र खाली पोलिसांची गाडी किंवा पोलीस उभे नसल्याचे तिला आढळले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा संशय तिला आल्याने तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे तक्रार दिली.
नाझियाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांविरोधात कलम 170, 171, 419, 420, 452 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलिसांनी काही तासातच सरफराज शब्बीर अहमद अंसारी उर्फ पापा आणि अमोल धर या दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी दोघांकडून 83 हजार रुपये जप्त केले आहेत.