Thane TMC : आर्थिक संकटात असलेल्या ठामपाच्या कर्मचाऱ्यांना 15,500 दिवाळी बोनस, महापौर नरेश म्हस्के यांनी केली घोषणा
ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सन 2020 -2021 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त 15 हजार 500 इतके सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्यात येणार आहे.
Thane TMC : आर्थिक तोट्यात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनायां सन 2020 -2021 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त 15 हजार 500 इतके सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्यात येणार आहे. महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज त्यासंदर्भात घोषणा केली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीच्या आधीच हा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना खुश करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यायांना यावर्षी 15,500 इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील 6,885 कायम अधिकारी कर्मचारी, 314 एकत्रित मानधनावरील कर्मचारी, शिक्षण विभागाकडील 973 कर्मचारी आणि परिवहन सेवेमधील 1897 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. हा बोनस दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे महापालिका आुयक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.
Theater Reopen : ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये तरुणाई चित्रपटगृहात,कसा मिळतोय सिनेमागृहांना प्रतिसाद?
दुसरीकडे ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी एकूण 16 कोटी इतका खर्च होणार आहे. कोरोना काळात घटलेले उत्पन्न, विविध राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्थांकडे अडकलेले पैसे यांमुळे पालिका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. पालिकेच्या तिजोरीत केवळ 25 कोटी रुपये शिल्लक आहेत. अश्यात या बोनसरूपी खर्चाचा बोझा पालिकेला उचलावा लागणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पैसे कसे उभारायचे याच्या विचारात असलेल्या पालिकेला बोनस पण द्यावा लागणार असल्याने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय स्वार्थापोटी हे निर्णय घेतले जात असल्याची टीका केली जात आहे.