ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने येणार, आनंद दिघे यांच्या देवीची रश्मी ठाकरे आरती करणार, दिघेंची देवी कोणत्या गटाला पावणार?
Thane Navratri 2022 : ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील आनंद दिघे यांच्या देवीची रश्मी ठाकरे करणार आरती, पुढील दोन दिवस ठाकरे गटाकडून मुंबई ठाण्यात देवीचा जागर
Thane Navratri 2022 : राज्यासह (Maharashtra) संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव (Navratri 2022) धुमधडाक्यात साजरा होत आहे. मुंबईतही (Mumbai) नवरात्री जल्लोषात साजरी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राजकीय पक्षांमध्येही नवरात्री साजरी करण्यावरुन चढाओढ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यातील प्रबळ पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेमध्ये (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीमुळे फुट पडल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम नवरात्रोत्सवावरही झाल्याचं दिसत आहे. मुंबई-ठाण्यातील महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध अशा देवींची आरती आणि तेथील नवरात्रोत्सव साजरा करण्यावरुन चढा-ओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
ठाण्यातील टेंभी नाका (Tembhi Naka) नवरात्रोत्सवात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्या (गुरुवार) देवीची आरती पार पडणार आहे.उद्या रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीचा जागर पार पडणार आहे.
ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रोत्सव म्हणजे, प्रसिद्ध मंडळांपैकी एक. टेंभी नाका येथे नवरात्रोत्सवाला सुरुवात आनंद दिघे यांनी केली होती. दरवर्षी अनेक राजकीय नेते मंडळी देवीच्या दर्शनासाठी येथे हजेरी लावत असतात. याठिकाणी रश्मी ठाकरे दरवर्षी आरतीसाठी येत असतात. अशातच, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्या (गुरुवारी) रश्मी ठाकरे आल्या तर ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण मंडळाकडून उद्या संध्याकाळची आरती आधीच शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नावावर जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या कार्यक्रमपत्रिकेत मीनाक्षी शिंदे आणि महिला आघाडीच्या नावावर उद्याची आरती जाहीर करण्यात आली आहे. मीनाक्षी शिंदे यांची ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री यांनी नियुक्ती केली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही महिला आघाडी आमने-सामने येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, एकीकडे, मराठी दांडिया, दसरा मेळावा यावरून ठाकरे गट, शिंदे गट, भाजप यांचं राजकारण रंगलं असतानाच आता ठाकरे गटाकडून मुंबई ठाण्यात दोन दिवस देवीचा जागर केला जाणार आहे. हा जागर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उद्या ठाण्यातल्या टेंभी नाका इथे आनंद दिघे यांच्या देवीची आरती करणार आहेत. शिवसेनेतून सीमोल्लंघन केलेल्या शिंदेंनी दिघेंच्या नावानं आपली राजकीय वाटचाल पुढे ठेवली आहे. त्यातच आता रश्मी ठाकरे त्याच दिघेंच्या देवीची आरती करणार आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय संघर्षात दिघेंची देवी कोणत्या गटाला पावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.