...अन् जितेंद्र आव्हाडांना थांबवत श्रीकांत शिंदे थेट बोलू लागले; जितेंद्र आव्हाड-श्रीकांत शिंदे संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर
जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील ठाण्यातील राजकारणावरून सुरू असलेला सुप्त संघर्षाची आज पुन्हा एकदा झलक पहायला मिळाली.
मुंबई: राज्याचे गृहनिर्मान मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील सु्प्त संघर्ष आजही पहायला मिळाला. ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड बोलायला उभे राहिल्यानंतर खासदार श्रीकांत शिदे यांनी त्यांना थांबवलं आणि थेट उठून बोलायला सुरुवात केली.
ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या मार्गिकेचे उद्घाटन केलं. पण त्या आधी जितेंद्र आव्हाड बोलायला उभे राहिल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी त्यांना अचानक थांबवलं आणि आपण बोलायला सुरुवात केली. श्रीकांत शिंदे म्हणाले की, गेली 14 वर्षे हा प्रकल्प रखडला होता. माझ्या मतदार संघात हा प्रकल्प येतो, आता मात्र तो पूर्ण झाला, त्यासाठी मी रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करतो, रेल्वे मंत्र्यांचे आभार व्यक्त करतो. अजून मोठे प्रकल्प माझ्या मतदारसंघात सुरू आहेत. कळवा ऐरोली एलिव्हटेड प्रकल्प लवकर सुरू करावा अशी मागणी करतो.
खारेगाव उड्डाणपुलावरूनही आमने-सामने
ठाण्यात गेल्या 14 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आले होते. या पुलाच्या श्रेयवादावरुन बोलताना तुम्ही हिशोब काढला म्हणून मी काढला असा टोला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला होता. राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे या दोघांनीही आपणच निधी आणल्याचा दावा केला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत यांच्यात अनेक कार्यक्रमात शाब्दिक जुगलबंदी बघायला मिळते.
श्रीकांत शिंदेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तरुण आहे, खूप मेहनत घेतोय. त्याच्यावर एखादी जबाबदारी दिली की तो ती पार पाडतोच. अंबरनाथमध्ये एक प्राचिन मंदिर होतं. मी त्याला म्हणालो की, श्रीकांत काहीतरी कर तिकडे. तर त्याने या मंदिराच्या परिसरात खूप चांगलं काम केलं. आता त्या ठिकाणी जाणं म्हणजे पवित्र वाटतंय.
ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन
मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झालं. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे प्रवाशांना 36 अधिकच्या लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. यातील 34 फेऱ्या वातानुकूलित असतील आणि दोन फेऱ्या सध्या लोकलच्या असतील.
संबंधित बातम्या:
- श्रीकांत मेहनती, देईल ती जबाबदारी पार पाडतो; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर केलं श्रीकांत शिंदेंच्या कामाचं कौतुक
- Mumbai Local News: एसी लोकलचे तिकीट दर कमी होणार! रेल्वेमंत्र्यांचं सूचक वक्तव्य
- Mumbai Local News: मुंबईचं सामर्थ्य वाढवणार, लोकलला अत्याधुनिक रुप देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा