डेटा चोरुन कॉसमॉस बॅंकेला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांकडून अटक
त्रिकुटाने दुबई, दक्षिण आफ्रिका, यूके व अमेरिका या देशांतील बँकेचा डाटा चोरुन कार्ड क्लोनिंगद्वारे दुबई व भारतातील एटीएममधून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली.
मुंबई : पुण्यातील कॉसमॉस बॅंकेचा डेटा चोरुन 94 कोटी 42 लाखांची फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला ठाणे पोलिसांनी गजाआड केले आहे. एटीएम कार्ड क्लोन करुन पैसे काढणाऱ्या टोळीच्या चौकशीत ही माहिती पुढे आल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.
या त्रिकुटाने दुबई, दक्षिण आफ्रिका, यूके व अमेरिका या देशांतील बँकेचा डाटा चोरुन कार्ड क्लोनिंगद्वारे दुबई व भारतातील एटीएममधून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली. या त्रिकुटाला ठाणे न्यायालयाने 7 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली असून यातील एक आरोपी परदेशात लपला असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.
मुंब्य्रात एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या नावाचे आधार व पॅन कार्ड बाळगतो व तो वारेमाप पैसे उधळतो, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी शाबाज मोहम्मद आरिफ खत्री याच्यासह केशवराव मगता पात्र उर्फ रेड्डी याला 20 ऑगस्ट 2019 रोजी अटक केली. त्यांच्या चौकशीत कॉसमॉस बँकेतील काही आरोपी उत्तरप्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने असिफ शेख व फिरोज शेख या दोघांना अटक केली. या दोघांसह शाबाज खत्री यांचा पुण्यातील कॉसमॉस बँकेचा डेटा चोरुन फसवणूकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आहे. शाबाज याच्यावर मुंबईत पार्कसाईट आणि बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.