(Source: Poll of Polls)
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार
Thane News : बुधवारी सकाळी 9 ते गुरूवारी सकाळी 9 वाजेपर्यंत असं 24 तास ठाण्यातील काही भागांमधील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Thane News : ठाणे महानगरपालिकेच्या योजनेमधील 2000 मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढा धाम येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच तीनच्या बाजूस बुधवारी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी 9 ते गुरूवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास ठाण्यातील काही भागांमधील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माजीवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिध्देश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी तसेच कळव्याच्या व मुंब्य्राच्या काही भागात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी वितरणाबद्दल येणाऱ्या तक्रारी, शटडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी यांच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता अशा सर्वांची ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 7 मार्च रोजी एक बैठक घेतली होती. शहरातील कामांची पाहणी करताना पाणी वितरण, रस्त्यांच्या कामांमुळे वितरणात आलेल्या समस्या, जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीसाठी चार दिवस बंद ठेवण्यात आलेला पाणी पुरवठा आणि त्याचा संपूर्ण शहरावर झालेला परिणाम, या सर्वाचा आढावा आयुक्त बांगर यांनी बैठकीत घेतला होता. त्यावेळी त्यांनी पाणीपुरवठ्यांच्या समस्येवरून अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली होती.
"पाणी पुरवठ्याविषयीच्या तक्रारींबाबत मिळणारी उत्तरे बेजाबदार असून या विभागातील बहुतांश अधिकारी चालढकल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निरीक्षण नोंदवत पाणी समस्येवर आपल्याला तोडगा काढता येत नसेल, तर ते संस्था म्हणून आपले अपयश आहे, अशा शब्दात आयुक्त बांगर यांनी बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.
"रात्री-अपरात्री पाणी सोडणे म्हणजे महिलांच्या स्वास्थ्याशी खेळण्यासारखे असल्याने त्यांच्या सोयीनुसार पाणी वितरणाची वेळ असावी आणि पाणी पुरवठ्याबद्दल कोणतीही तक्रार आली तर ती विनाविलंब दूर करण्यासाठी अभियंत्यांनी संवेदनशीलता दाखवावी, त्याचबरोबर उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तात्काळ तयार करण्याचे आदेशही आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिले होते.
महत्वाच्या बातम्या