पक्षाच्या ग्रामपंचायतींचा आकडा फुगवण्यासाठी सरपंचांची खेचाखेची; मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीतील प्रकार
मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या संरपंचपदाच्या निवडीनंतर सोशल मीडियावरील व्हायरल फोटोनी धुमाकूळ घातला होता. सरपंचांनी सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत, संध्याकाळी भाजपात प्रवेश केल्याच्या चर्चा होत होत्या.
कल्याण : राजकारणात कोण कधी कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या संरपंचपदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाला. नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांची सदिच्छा भेट त्यांच्या चांगलीच अंगलट आली. सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचे फोटो पक्ष प्रवेशाच्या नावाने व्हायरल झाले. याबाबत राष्ट्रवादी, भाजप, सेना या तिन्ही नेत्यांनी या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता असल्याचा दावा केलाय. त्यानंतर हे नाट्य चांगलेच गाजले, तर उपसरपंच यांनी मात्र "आम्ही शिवसेनेतच असून आम्ही फक्त सदिच्छा भेट घेतली होती. मात्र राजकीय बदनामी करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप केलाय." तर भाजप आमदार किसन कथोरे यांनी "हे आपल्या दाव्यावर ठाम असून कोणाच्याही गळ्यात पट्टे टाकुन राजकारण करू नका, येत्या 17 तारखेला चित्र स्पष्ट होईल.' असं आवाहन शिवसेनेला केलंय.
मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच दर्शना बांगर आणि उपसरपंच सुनील बांगर यांचे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, त्यानंतर भाजप आमदार किसन कथोरे तर त्यानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासोबतच फोटो व्हायरल झाले. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेने हे आपलेच सदस्य असल्याचा दावा केला. सोशल मीडियावर देखील हे पक्षप्रवेश केल्याचा कांगावा करत फोटो चांगलेच गाजले. राजकीय वर्तुळात दिवसभर हा विषय चर्चिला जात होता. अखेर उपसरपंच सुनील बांगर यांनी आम्ही शिवसैनिक असून या ग्रामपंचायतीच्या सातमधील चार जागा शिवसेना आणि एक जागा राष्ट्रवादीने जिंकली. ग्रामपंचायतीवर सत्ता शिवसेनेची आहे, आम्ही शिवसेनेत आहोत, हिंदुराव त्या ठिकाणी आले म्हणून आम्ही भेट घेतली. तर स्थानिक आमदार म्हणून किसन कथोरेंची भेट घेतली, कुणी तरी राजकीय दृष्टया बदनाम करण्यासाठी हे नाट्य रचल्याचा आरोप केला आहे.
याबाबत भाजप आमदार किसन कथोरे यांनी "ग्रामपंचायतिची निवडणूक कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून लढवली जात नाही. मात्र एखादा उमेदवार निवडून आल्यानंतर त्याच्या गळ्यात पट्टा टाकून त्याला पक्षाचे लेबल चिकटवले जाते. सध्याच्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या महिलेला राजकारणाचा कोणताही अनुभव नाही. त्यांना फक्त काम करणं माहित आहे. मात्र शिवसेनेचे काही पदाधिकारी गोळाबेरीज करण्यासाठी कोणाच्याही गळ्यात पट्टे टाकून फोटो काढतात. अशा प्रकारे कोणाचीही बदनामी करू नका. एक महिला गावची सरपंच झाली आहे. तिचा सन्मान करा.", असं आवाहन कथोरे यांनी केले. तर "त्या महिला काल मला भेटून गेल्या त्या माझ्या नात्यातल्या आहेत. त्यामुळे त्या कोणाबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र मुरबाड मतदार संघात शिवसेनेची परिस्थिती ढासळली असून त्यांचा गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र 17 तारखेला भाजपच्या माध्यमातून आपण मुरबाड मतदार संघातून निवडून आलेल्या सर्व सरपंचाचा आपण सत्कार ठेवला असून तेव्हा हे सरपंच कोणत्या पक्षाचे आहेत हे चित्र स्पष्ट होईल. सरपंच पदाच्या निवडणुकीत राजकारण आणू नये." असं आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
व्वा रे पठ्ठे! सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत, संध्याकाळी भाजपात, मुरबाडमधील प्रकार