मुंबईमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला? पाकिस्तानमधून फोन, ताज हॉटेल उडवण्याची धमकी
पाकिस्तानात कराची स्टॉक एक्सेंजवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवणार असल्याची धमकी देणारा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने 26/11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा एकदा होणार असल्याची धमकी दिली.
मुंबई : कराची स्टॉक एक्सचेंजच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला असून हा फोन पाकिस्तानमधून ताज हॉटेलमध्ये करण्यात आला होता. फोनवर एक व्यक्ती बोलत होता. ती व्यक्ती म्हणाली की, 'कराची स्टॉक एक्सेंजमध्ये झालेला दहशतवादी हल्ला सर्वांनीच पाहिला. आता ताज हॉटेलमध्ये 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार.'
ताज हॉटेल व्यवस्थापनाकडून लगेचच मुंबई पोलिसांनी यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्रभर मुंबई पोलीस आणि हॉटेल स्टाफ यांनी मिळून सुरक्षेची पाहणी केली. हॉटेलमध्ये येणारे गेस्ट आणि त्यांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दक्षिण मुंबई आणि किनारपट्टीवरील गस्त आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
26/11चा हल्ला
26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.
पाहा व्हिडीओ : मुंबईमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला? 'ताज हॉटेल'मध्ये दहशतवादी हल्ला करण्याची धमकी
26 नोव्हेंबर 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलसोबतच इतर 6 ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्याज जवळपास 166 लोकांचा मृत्यू झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर ताज हॉटेलमध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला होता.
मुंबईला वेठीस धरणाऱ्या सर्व दहशतवाद्यांपैकी फक्त एकाच दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं, त्याचं नाव अजमल मोहम्मद कसाब. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी एके-47 आणि ग्रेनेडने मुंबईवर हल्ला केला होता. मुंबई पोलिसांनी प्राणांची बाजी लावून एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. 3 महिन्यांमध्ये त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले. तसेच एक वर्षानंतर या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या डेव्हिड कोलमॅन हेडली यानेही 18 मार्च 2010 रोजी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला फाशी देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या :
पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सेंजवर दहशतवादी हल्ला; चार अतिरेक्यांचा खात्मा