(Source: Poll of Polls)
Suniel Shetty VIDEO : मुंबईत राहताय तर मराठीत बोललं पाहिजे, सुनील शेट्टीचा भावनिक संदेश, बाहेरुन आलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन
Suniel Shetty On Marathi : मुंबईत राहताना इथल्या मातृभाषेचाही आदर करणं आवश्यक आहे. मराठीत बोलणं ही आपली जबाबदारी असून ती भाषा शिकली पाहिजे असा सूर सुनील शेट्टीचा होता.

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या ठिकाणी पोटापाण्यासाठी देशभरातून अनेकजण येतात. मुंबईत काही वर्षांपासून राहणारे लोक आहेत, तर अनेकांच्या काही पिढ्याही या शहरात गेल्या आहेत. असं असतानाही बाहेरुन मुंबईत कामानिमित्त आलेले लोक हे मराठी भाषा बोलत नाहीत. इथली संस्कृती न अवलंबता आपलीच संस्कृती रेटतात. त्यामुळे कधीकधी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद होतो. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुनील शेट्टी याने एक वक्तव्य केलं आहे. मुंबईत राहायचं तर मराठी आली पाहिजे असं तो म्हणाला. सुनील शेट्टीचे मराठीसंबंधित वक्तव्य हे अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरेल.
अभिनेता सुनील शेट्टीने मुंबईत राहणाऱ्या सर्वांसाठी एक भावनिक आवाहन करत मराठी भाषेबाबत आपली जाणीवपूर्वक भूमिका स्पष्ट केली. मुंबई ही आपली कर्मभूमी आहे आणि इथली मराठी भाषा शिकणे, ती बोलणे हे आपलं कर्तव्य असल्याचं तो म्हणाला. मराठीत बोलता न येणं याबद्दल आपल्याला वाईट वाटलं पाहिजे असंही तो म्हणाला.
Suniel Shetty On Marathi Language : काय म्हणाला सुनील शेट्टी?
मी मुंबईत राहतो. माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. मला मराठी नाही आली तरी चालेल. पण मी जर मराठी बोललो तर तुम्हाला बरे वाटेल, सर्वांनाच बरे वाटेल. जर कर्मभूमीत राहून मी मराठी बोललो नाही तर त्याचा दुसऱ्यांना नाही तर स्वतःला त्रास झाला पाहिजे. मराठी येत नाही याबद्दल स्वतःला वाईट वाटलं पाहिजे. इथे राहून मराठी शिकायचं आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. जसं इतर लोक मराठी बोलतात तसं मराठी आपल्यालाही बोलता आलं पाहिजे.
Suniel Shetty Video On Marathi : मराठीत बोला, सुनील शेट्टीचा संदेश
मुंबईत राहताना इथल्या मातृभाषेचाही आदर करणं आवश्यक आहे. मराठीत बोलणं ही आपली जबाबदारी असून ती भाषा शिकली पाहिजे असा सूर सुनील शेट्टीचा होता.
सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानं सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी त्याचे कौतुक केलं आहे. मुंबईत अनेक दशकांपासून राहणारे परप्रांतीय नागरिक मराठी शिकत नाहीत, हे वास्तव अधोरेखित करत सुनील शेट्टीने त्यांना मराठी शिकणाच्या अप्रत्यक्ष संदेश दिला आहे.
Marathi Vs Hindi In Mumbai : भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं पाऊल
मुंबईत अनेक वेळा 'मराठी विरुद्ध हिंदी' असा वाद चिघळताना दिसतो. कामानिमित्ताने बाहेरच्या राज्यातून आलेल्यांनी स्थानिक संस्कृतीचा, भाषेचा सन्मान न केल्यामुळे तणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत, एखाद्या लोकप्रिय कलाकाराने अशा प्रकारची संवेदनशील भूमिका घेणं महत्त्वाचं ठरतं. सुनील शेट्टीने फक्त भाषेचा आग्रह न धरता, 'मराठी येत नाही याचं स्वतःला वाईट वाटलं पाहिजे' असं म्हणत आत्मपरिक्षणाचा संदेश दिला.
भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून, ती संस्कृतीची ओळख असते. मुंबईसारख्या शहरात मराठी भाषेबद्दल समज आणि आदर वाढवण्यासाठी सुनील शेट्टीसारख्या कलाकारांचे पुढे येणं काळाची गरज आहे.




















