लॉकडाऊनमुळे नोकरी गेली म्हणून वरळी सी-लिंक वरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
अनेक प्रयत्न करूनही कुठे नोकरी मिळत नव्हती, मात्र घर चालवायचं कसं? उदरनिर्वाह करायचा कसा? या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून या तरुणाने आत्महत्येचा मार्ग निवडला आहे.
मुंबई : देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण प्रचलित आहे जी आज प्रत्यक्षात वरळी सी लिंक वर पाहायला मिळाली आहे. एकीकडे गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आणि अशात एका प्रश्नाच उत्तर मिळत नव्हतं म्हणून वाळकेश्वर येथे राहणाऱ्या एका तरुणाने वरळी सी लिंक वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
वाळकेश्वर येथे राहणाऱ्या 32 वर्ष एक तरुण डिलेवरी बॉयची नोकरी करत होता. मात्र कोरोना पासून उद्भवलेल्या संकटातून तो ही वाचू शकला नाही. गेल्या दोन वर्षात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांच्या दोन वेळेच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला. अनेक प्रयत्न करूनही कुठे नोकरी मिळत नव्हती, मात्र घर चालवायचं कसं? उदरनिर्वाह करायचा कसा? या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून या तरुणाने आत्महत्येचा मार्ग निवडला आहे.
आज दुपारी तीनच्या सुमारास वरळी पोलिसांना एक फोन आला आणि त्याने माहिती दिली की वरळी सी लिंक वरून एका तरुणाने उडी मारली आहे. क्षणाचाही विलंब न करता वरळी पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली
सिलिंक वर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या बोटीने त्या तरुणा जवळ पाण्यात पोहोचले आणि त्याला पाण्याच्या बाहेर काढले. त्याच्या पोटात पाणी शिरलं होतं ते तात्काळ काढूण्यात आलं. रस्ता छोटा असल्यामुळे तिथे चार चाकी वाहन जाणं शक्य नव्हतं म्हणून बाईकवर त्याला दोघांच्या मध्ये बसून पोद्दार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नायर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आल असून त्या तरुणाची प्रकृती आता स्थिर आहे.
पोलिसांनी तरुणाच्या आईला संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि त्याच्या घरच्यांना बोलावून घेतलं. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि त्या तरुणाच्या प्राण वाचले. नोकरी गेली किंवा हातात कुठल्याही प्रकारचा काम धंदा नाही म्हणून आत्महत्येचा मार्ग हा पर्याय किंवा त्या प्रश्नाला उत्तर कधीच नसू शकतो. लोकांनी सकारात्मक रहावं आणि जी परिस्थिती उद्भवेल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
गेल्या दोन वर्षात अनेक गरजूंना मदत करणाऱ्या समाजसेविका दिव्या ढोले यांनी अशा प्रकारचे कृत्य कोणीही करू नये असा आवाहन केल असून, जर लोकांना काही मदत लागत असेल तर त्यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच प्रत्येक परिस्थितीला उत्तर असत मात्र आत्महत्या करणे हे कुठल्याही परिस्थितीला उत्तर असू शकत नाही, आणि आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाही अस मत देखील दिव्या ढोले यांनी व्यक्त केले आहे.