(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला
मुंबई उच्च न्यायालयाची सुरक्षा वाऱ्यावर?मुख्य प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टर यंत्रणा दोन महिन्यांपासून बंदमुंबई उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्नपोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी (17 जून) पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक अनुचित प्रसंग टळला. सकाळी कोर्टाचं कमकाज सुरु होताच न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या 9 नंबरच्या कोर्ट रुममध्ये एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना लागलीच ताब्यात घेतलं. तुषार शिंदे यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे सोपवण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं?
तुषार शिंदे असं या 55 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो माजी सैनिक आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर दुसऱ्या क्रमांकावर शिंदे यांच्या प्रकरणावर सुनावणी काही निर्देश देण्यासाठी ठेवली होती. ते निर्देश विरोधात गेल्याने शिंदे अतिशय निराश झाले. सुनावणी संपल्यानंतर वकिलांनी त्यांना बाहेर येण्यास सांगितलं. काही पावलं मागे गेल्यावर शिंदे पुन्हा न्यायमूर्तींच्या दिशेने वळले आणि अचानक आपल्याजवळील एका छोट्या धारदार कटरने हातावर तीन वार करुन घेतले. ही घटना घडताच न्यायदालनात सारेच स्तब्ध झाले. मात्र प्रसंगावधान राखत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी उपस्थित वकिलांच्या मदतीने तुषार शिंदे यांना लागलीच ताब्यात घेतलं.
गेल्या काही वर्षांपासून कुटुंबियांसोबतच संपत्तीच्या वादाचं प्रकरण सुरु असल्याने निराशेच्या गर्तेत तुषार शिंदे यांनी हे कृत्य केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर शिंदे यांना दुपारी आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं.
हायकोर्टाची सुरक्षा वाऱ्यावर?
आजची ही घटना घडल्यानंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी माहिती दिली की, मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट नंबर 4 या मुख्य प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टर मशीन ही गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. तर गेट नंबर 3 वरील मेटल डिटेक्टर मशीनही गेले काहा दिवस बंदच आहे. यासाठी हायकोर्टातील पोलिसांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र त्याला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे असे अनुचित प्रसंग टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक यंत्रणांकडे गांभीर्याने पाहायची गरज आहे.