वरळीतील शासकीय वसतिगृहाच्या जागेत अनधिकृत बांधकामे, विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन
Worli : वरळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Hostel) जागेत काही अनधिकृत बांधकामे करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी या विरोधात बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
मुंबई : वरळीतील (Worli) डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Hostel) जागेत काही अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. शिवाय रहदारीच्या जागेत अनधिकृत वाहने पार्किंग करून मुलांची आणि प्रामुख्याने अंध विद्यार्थी व विद्यार्थिनींची गैरसोय केली जात असल्यामुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी अनधिकृत बांधकामे हटवण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, अनधिकृत बांधकामे हटविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन होते. परंतु, याच लॉकडाऊनचा फायदा घेत काही लोकांनी वसतिगृहाच्या मालकीच्या जागेत अनधिकृत बांधकामे सुरू केली आहेत. ही अनधिकृत बांधकामे हटवण्यात यावीत यासाठी वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार केली. परंतु, विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. शिवाय अधीक्षक अभियंता यांनी अनधिकृत बांधकामे हटवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले. आज सकाळी नऊ वाजल्यापासू भर पावसात हे विद्यार्थी वरळीच्या सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता वसतिगृह परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर संबंधित अनधिकृत बांधकामधारकांवर कारवाई करू असे आश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. परंतु, जो पर्यंत ही बांधकामे हटवली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली आहे, अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी बुद्धभूषण कांबळे याने एबीपी माझासोबत बोलताना दिली.
विद्यार्थ्यांना जिवे मारण्याची धमकी
वसतिगृहाच्या जागेतील हे अनधिकृत बांधकाम आम्ही पोलिसांना तक्रार करून थांबवले होते. परंतु, आज बांधकाम करणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीने मुलांना अरेरावी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी वरळी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. संबंधित स्थानिक व्यक्तीनेही विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, पोलिसांनी संबंधितांना समज दिली आहे.
"आम्ही खेडेगावातून शिक्षणासाठी आलो आहोत. परंतु, भीती घालून आम्हाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारांमुळे आमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामळे आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देवू. जोपर्यंत वसतीगृहाच्या जागेतील अनधिकृत बांधकामे हटवली जात नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच ठेवणार आहोत, अशी माहिती वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दिली.