मुंबईत मोकळ्या जागांवर होणाऱ्या मोठ्या पार्ट्यांकरता कठोर निर्बंध
मोठ्या पार्ट्यांकरता मुंबईत राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले आहेत. बँन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.
![मुंबईत मोकळ्या जागांवर होणाऱ्या मोठ्या पार्ट्यांकरता कठोर निर्बंध state government Strict restrictions on large open parties in mumbai मुंबईत मोकळ्या जागांवर होणाऱ्या मोठ्या पार्ट्यांकरता कठोर निर्बंध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/15/10714dee79cc5ad695f1577632cfbc36_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दक्षता बाळगली आहे. मोकळ्या जागांवर होणाऱ्या मोठ्या पार्ट्यांकरता मुंबईत राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले आहेत. मुंबईत (Mumbai) मोकळ्या जागी जसे रेसकोर्स, मोठी मैदाने येथे होणाऱ्या जंगी कार्यक्रमांना केवळ २०० लोकांनाच परवानगी देण्यात आल्याची माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितले. बँन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. तर मोकळ्या जागांवर क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी मिळणार आहे. याचबरोबर घरी होणाऱ्या पार्ट्यांवर देखील पालिकेची नजर असणार आहे. लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहनही आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे.
अशी असेल नियमावली
१) बंदीस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
२) मोकळ्या जागी २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
३) ३१ डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेची ४ पथकं तैनात असतील.
४) नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेल मालक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
३१ डिसेंबर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे.
जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) कहर माजवला आहे. जगातील 77 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट प्रसार झाला आहे. त्यामुळे सर्वच देशांमध्ये सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हा इतर कोरोनाच्या प्रकारापेक्षा अधिक धोकादायक असून, वेगाने पसरणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)ने म्हटले आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनावर भर देत लक्षणे आणि उपाय शोधण्यासाठी परिश्रम घेत आहेत. एका संशोधनात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या लक्षणांबाबत अभ्यास करण्यात आला. ओमायक्रॉन व्हेरियंट सध्या उपलब्ध कोरोना लसींना अत्यंत प्रतिरोधक आहे. उपलब्ध असलेल्या कोविडपैकी कोणतीही लस ओमायक्रॉन व्हेरियंटवर पूर्णपणे प्रभावी नाही. आतापर्यंतच्या परिणामांवरून असे दिसून आले आहे की कोरोनाच्या सुरुवातीच्या प्रकारांच्या तुलनेत या नवीन प्रकारामध्ये लक्षणे कमी गंभीर असल्याचे आढळून आले आहे. मात्र, सर्व ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणे हे समान लक्षण आढळून आले आहे.
महाराष्ट्रातही ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढ असल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 109 वर पोहचली आहे. यामुळेचे मुंबई पालिकेने देखील खबरदारी म्हणून कठोर निर्बंध घातले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)