ST workers strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; 63 आगारातील वाहतूक ठप्प
ST workers strike : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची धार कमी होण्याची चिन्हं नाहीत. शनिवारी 63 आगारातील एसटी वाहतूक बंद होती.
मुंबई : वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू असलेला संप अद्यापही सुरू आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यातील 250 एसटी आगारांपैकी 63 आगारातील वाहतूक ठप्प होती. संपाचा सर्वाधिक प्रभाव औरंगाबाद विभागात दिसून आला. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यातील 47 पैकी 30 आगार बंद होते.
एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद, नागपूर विभागीय प्रदेशात संपाचा जोर असल्याचे सूत्रांनी म्हटले. नागपूर विभाग प्रदेशातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील 26 पैकी 17 आगारातील वाहतूक ठप्प आहे. मुंबई विभाग प्रदेशात एसटीची वाहतूक सुरळीत होती. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे या जिल्ह्यातील सर्व 45 आगारातून एसटी वाहतूक सुरळीत सुरू होती.
एसटीच्या पुणे विभाग प्रदेशातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील 55 पैकी फक्त 5 आगारातील वाहतूक बंद होती. तर, 50 आगारातून वाहतूक सुरळीत सुरू होती. नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील 44 आगारांपैकी फक्त 4 आगारातील वाहतूक बंद होती.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कामगार संघटना ठाम असल्याचे चित्र आहे. सोमवारी कोर्टात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपचा आंदोलनाचा इशारा
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण, वेतन व इतर मुद्यांवरून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता भाजपने उडी घेतली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी मुलांबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसतील असा इशारा पडळकरांनी दिला आहे.
संबंधित बातम्या:
एसटी कर्मचारी संप: मंत्रालयाच्या प्रांगणात आंदोलनाचा भाजपचा इशारा
ST workers Strike ...तर एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका; राज ठाकरे यांचा इशारा