(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Workers Protest : 'सिल्वर ओक' प्रकरणात पोलीसच जबाबदार? मंत्रालयातील पत्रात गौप्यस्फोट
ST Workers Protest : एसटी कर्मचारी सिल्वर ओक, मातोश्रीवर आंदोलन करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे एका पत्रातून उघड झाले आहे.
ST Workers Protest : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक आंदोलन प्रकरणात पोलीसच जबाबदार असल्याचं बोलले जात आहे. पोलिसांनी 4 एप्रिलला अलर्ट देऊनही दुर्लक्ष झाल्याचे एका पत्रावरुन स्पष्ट होत आहे. शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणात मंत्रालयात पाठवण्यात आलेल्या एका पत्रातून हा मोठा गौप्यस्फोट झाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 4 एप्रिललाच इशारा दिला होता. मुंबई पोलीस सह-आयुक्त कायदा व सुव्यवस्था यांना पाठवण्यात आलेले गोपनीय पत्र समोर आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून, 4 एप्रिल रोजी मंत्रालय आणि 5 एप्रिल रोजी सिल्व्हर ओक, मातोश्री बंगल्यावर आंदोलन होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती. त्याशिवाय 5 एप्रिलला दोन्ही ठिकाणी आंदोलन होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असेही पोलिसांनी म्हटले.
उच्च न्यायालयातील निकालाचा एसटी कर्मचाऱ्यांना अंदाज?
पोलीस सहआयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार, 5 एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी होणार होती. आझाद मैदानात जवळपास 1500 ते 1600 पुरुष आणि महिला आंदोलनकर्ते ये-जा करत असून त्यांची संख्या वाढत असल्याचे पोलिसांच्या पत्रात म्हटले आहे. विलीनीकरणबाबत उच्च न्यायालयात आपल्या विरुद्ध निकाल लागू शकतो याची जाणीव कर्मचाऱ्यांना झाली असल्याचे ही पोलिसांच्या गोपनीय पत्रात म्हटले आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी 8 एप्रिल रोजी आक्रमक आंदोलन झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी चौकशीसाठी त्याच रात्री ताब्यात घेतले होते. अखेर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली होती. तर, आंदोलन करणाऱ्या 109 कर्मचाऱ्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. यातील काही आंदोलकांनी मद्य प्राशन केले असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: