Mankhurd : मानखुर्द: दोन गटांमधील राडा प्रकरणात 7 जणांना अटक, परिसरात तणावपूर्ण शांतता
Mankhurd : मानखुर्द मध्ये दोन गटात झालेल्या राडा प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.
Mankhurd : मुंबईच्या मानखुर्दमधील म्हाडा कॉलनीत रविवारी रात्री जमावाकडून तोडफोड करण्यात आली. दोन गटात झालेल्या राड्यात तीस ते चाळीस गाड्यांची तोड फोड करण्यात आली. पोलिसांनी या राड्याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. विभागात पोलिसांचा बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे.
रविवारी, मानखुर्द येथील पीएमजीपी म्हाडा कॉलनीत दोन गटात मोठा वाद झाला. या वादातून काही तरुणांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर रात्री उशिरा तब्बल 30 ते 40 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दोन्ही बाजूने पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एका गटातील पाच आणि दुसऱ्या गटातील दोघांना असे एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तणाव वाढवणाऱ्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी रात्री मुंबईतील मानखुर्द परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात काही लोकांनी एकत्र येऊन तोडफोड करण्यास सुरुवात केली. रात्री 10 वाजता 15 ते 20 जणांच्या जमावानं एकत्र येऊन गाड्यांची तोडफोड केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले.
जाती धर्माच्या नावाखाली दंगल भडकावण्याचा प्रयत्न: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावाखाली दंगल भडकावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये काल रात्री घडलेल्या तोडफोडीच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच दंगलखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील जनतेला गृहमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. आपल्या देशात सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र राहण्याचा अधिकार संविधानानं दिला आहे. हल्ली राजकीय फायद्यासाठी दोन समाजाच्या लोकांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नुकसान होतंय. विकासाबाबत विचार करायला हवा. लोकांच्या समस्या सोडवायला हव्यात. पण हल्ली समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.