Uddhav Thackeray : रावणानं संन्याशाचं रुप घेऊन सीताहरण केलं, हे तोतया बाळासाहेबांचा चेहरा वापरुन शिवसेना पळवतायत: उद्धव ठाकरे
Dasara Melava 2022 : हिंमत असेल तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन ताब्यात घ्या असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिलं.
Uddhav Thackeray : जसं रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीता हरण केलं होतं तसं हे तोतया बाळासाहेबांचा चेहरा वापरून शिवसेना पळवतायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केली. मान सन्मान घेऊन मी अडीच वर्षे काम केल, पण माझ्या कानात त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कधीही सांगितलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री की भाजपचे घरगुती मंत्री आहेत, सगळीकडे नुसता फोडाफोडी सुरु केली असंही ते म्हणाले.
बांडगुळं छाटली गेली
शिवसेनेतून हे लोक बाहेर गेली हे एका अर्थाने चांगलं झालं, ही बांडगुळं तरी छाटली गेली. बांडगुळं गेली तर त्यांची मुळंही जातात, पण त्या वृक्षाची मुळं जमिनीत असतात. ज्या महिषासुर मर्दिनीने महिषासुराचा वध केला तीच महिषासुर मर्दीनी आता या गद्दारांना धडा शिकवेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शाह यांच्यावर टीका
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री हेच समजत नाही. सगळीकडे नुसतं फोडाफोडी सुरू आहे. या राज्यात जा, तिकडे फोडाफोड कर हेच सुरू आहे. अमित शाह म्हणाले की शिवसेनेला जमीन दाखवू. त्यांनी पहिला पाकव्याप्त जमीन जिंकून दाखवावी. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणार असं मोदी म्हणायचे. चीनने अरुणाचलमध्ये जमीन बळकावली, ती आधी घेऊन दाखवा."
दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ
उद्धव ठाकरे म्हणाले की , "सरकार बदलल्यानंतर राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत. त्यावेळी हे मिंधे सरकार माना खाली घालून बसलेत. मान खाली झुकवली आणि 'उठेगा नाही साला' असा प्रकार आहे. दिल्लीत मुजरा अन् गल्लीत गोंधळ असा प्रकार मिंधे गटाचा आहे. त्यांच्या सरकारला आता 100 दिवस होणार आहेत, पण त्यापैकी 90 दिवस हे दिल्लीत गेलेत , कुर्निसात करायला."
या देशाची लोकशाही धोक्यात
या देशाची लोकशाही धोक्यात असल्याचं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, "हा देश हुकुमशाहीच्या मार्गावर जात आहे. या देशात गुलामगिरी येऊ शकते. काही दिवसांपूर्वी मोहन भागवत हे मुस्लिमांना भेटायला गेले होते. पण आम्ही काँग्रेससोबत गेल्यावर हिंदुत्व सोडलं असा आरोप केला जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मोहन भागवत यांनी महिला शक्तीचा उल्लेख केला, पण उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारे नावाच्या मुलीचा खून झाला. त्या अंकिताची आई आज आक्रोश करते. तो हॉटेलमालक त्या अंकिताला अवैध्य कृत्य करायला भाग पाडत होता. ते हॉटेल भाजपच्या नेत्याचं आहे. मग त्यावर काय करणार आहे. बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या 11 आरोपींची सुटका करण्याचा निर्णय भाजपच्या सरकारने घेतला."
कोंबडी चोरांवर या मेळाव्यात बोलणार नाही
कोंबडी चोरांवरती या मेळाव्यावर बोलायचं नाही, बाप चोरणाऱ्यांवर या मेळाव्यात बोलायचं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. आजचा मेळावा हा विचारांचा मेळावा आहे असं ते म्हणाले.