Sanjay Raut Bail: ईडीची जामीन स्थगितीची मागणी नाकारली, संजय राऊत यांची आजच सुटका, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Sanjay Raut Bail : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला असून त्यांची आजच सुटका होणार आहे.
Sanjay Raut Bail : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी अशा आशयाची ईडीची मागणी मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांची आजच सुटका होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना आज जामीन मिळाला आहे.
संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीने विरोध दर्शवत त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर दुपारी 3 वाजता यावर सुनावणी करत विशेष सत्र न्यायालयाने अशी स्थगिती द्यायला नकार दिला आणि संजय राऊतांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला.
दोेन लाखांच्या कॅश बॉंडवर संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची सुटका करण्यात येणार आहे. संजय राऊत हे मागील 100 दिवसांपासून तुरुंगात आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता ईडी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या कामकाजाची वेळ साडे चार वाजेपर्यंत आहे. पण ईडीची ही याचिका तातडीने उच्च न्यायालयात घेतली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टायगर इज बॅक, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण असून शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाला दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसैनिकांमध्ये आज हजार हत्तीचे बळ संचारले संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे. आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण आहे. आज खऱ्या अर्थाने दिवाळी असून आम्ही उत्साहाने साजरी करणार आहे. आमच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आमचा सेनापती परत आला आहे. त्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे. आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
भांडुपमधील घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष
संजय राऊतांना जामीन मंजूर होणं, हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. अशातच संजय राऊत यांच्या भांडुपमधील घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दुपारी तीन वाजता शिवसैनिकांकडून संजय राऊतांच्या घराबाहेर जल्लोष साजरा केला जाणार आहे. अशातच संजय राऊत यांच्या मातोश्रींनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "माझा मुलगा येतोय... आनंद आहे...", असं त्या म्हणाल्या.