ईडी चौकशीने काहींना विकृत आनंद मिळतो : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर प्रेशर टाकलं जातं. ते होणार हे माहीत आहे. संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहे. प्रेशर पॉलिटिक्स कोणाला करायचं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. जे कोणी हे करतं, कुठं केलं जातं सर्व आम्हाला माहीत आहे, असंही ते म्हणाले
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था दबाव आणलं जात आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. ईडी चौकशीने काहींना विकृत आनंद मिळतो. ज्यांना कोणाला यातून विकृत आनंद मिळत आहे, त्यांनी तो त्यांनी घेतला पाहिजे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर प्रेशर टाकलं जातं. ते होणार हे माहीत आहे. संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहे. प्रेशर पॉलिटिक्स कोणाला करायचं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. जे कोणी हे करतं, कुठं केलं जातं सर्व आम्हाला माहीत आहे, असंही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय संदर्भात एक व्यंगचित्र ट्वीट केलं आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ही व्यंगात्मक टीका आहे, ज्याला जे कळलं ते समजून घेतील.
राऊत म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये एक संस्कृती आहे, वेगळी परंपरा आहे. विरोध करणे हे विरोधी पक्षाचं काम आहे. त्यांनी विधायक काम केलं पाहिजे. विरोधीपक्षांनी आपली शक्ती लोकांच्या कामासाठी लावली पाहिजे, असं ते म्हणाले.
मोदींच्या पुणे दौऱ्य़ाबाबत बोलताना ते म्हणाले की, पुण्यात सर्वांचं स्वागत केलं जातं. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा कायम आदर आहे, असं राऊत म्हणाले.
कंगना प्रकरणावरुन कोर्टाच्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले की, बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली होती. बेकायदेशीर बांधकामवरील कारवाई बेकायदेशीर कशी ठरली? यासाठी मी संविधानाची काही पुस्तकं शोधत आहे, असं राऊत म्हणाले.