Sanjay Raut : ईडीच्या कारवाईमुळं सुरु झालेला भोंगा भाजपचा, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
तुमचे भोंगे जनताच बंद करेल, मनसेचे म्हसोबा बदलले असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. भाजपने राज ठाकरेंना अभय दिले आहे, त्यानंतर त्यांचा भोंगा सुरु झाल्याचे राऊत म्हणाले.
![Sanjay Raut : ईडीच्या कारवाईमुळं सुरु झालेला भोंगा भाजपचा, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल Shivsena Leader Sanjay Raut criticism on MNS chief Raj Thackeray Sanjay Raut : ईडीच्या कारवाईमुळं सुरु झालेला भोंगा भाजपचा, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/9e1d7d14475fbc719bf6978b18312e1b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut : ईडीच्या कारवाईमुळे राज ठाकरे यांचा भोंगा सुरु झाला आहे. भाजपने त्यांना अभय दिले आहे, त्यानंतर त्यांचा भोंगा सुरु झाला असल्याचे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. तुमचे भोंगे जनताच बंद करेल, मनसेचे म्हसोबा बदलले असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला. हिंदुत्वावरुन आम्हाला कोणी सांगू नये, आमच्या नसानसात हिंदुत्व असल्याचे राऊत यांनी सांगितले. काल ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. आज त्या टिकेला राऊतांनी उत्तर दिले.
मशिदीवरील भोंग्यावरुन राज ठाकरे यांनी काल बोलताना राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. याबाबतही राऊत यांना विचारले. यावेळी राऊत म्हणाले की, आम्हाला कुणी अल्टिमेटम देत नाही. फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच अल्टिमेटम द्यायची ताकद आणि कुवत होती. बाळासाहेब ठाकरे यांनी अतिरेक्यांना अल्टिमेटम दिला होता असेही राऊत म्हणाले. राज ठाकरेंचा भोंगा म्हणजे भाजपचा आहे. आमच्याशी लढू शकत नाहीत ते असे भोंगे लावत आहेत. ईडीच्या कारवायांबाबत केंद्राकडून अभय मिळाल्यामुळे हा भोंगा वाजू लागला असल्याचा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
दरम्यान, निराशेतून हे भोंगे वाजत आहेत. भाजपच्या भोंग्याचा काही उपयोग झाली, त्यामुळे आता राज ठाकरेंना भोंगा वाजवायला सांगत असल्याचे राऊत म्हणाले. आम्हाला याची चिंता नाही, आम्ही लढत राहू. तुम्ही आमच्या नकला करा, खोट बोला आम्ही मजबूत असल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत शिवराळ भाषेत बोलतात असे म्हटले जात आहे. मात्र, मला माझ्या भाषेचा गर्व आहे. जे महाराष्ट्रद्रोही आहेत,अशा लोकांच्या विरोधात मी अशीच भाषा वापरणार असल्याचे राऊत म्हणाले. संतापून माझ्या तोंडून अपशब्द पडले असतील, तर मराठी जनता मला माफ करेल. तो माझ्या तोंडातून निघालेला अंगार असल्याचे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विरोधी कोणी बोलत असेल तर शिवराळ भाषा मी वापरणार. ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेतच उत्तर देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)