राज ठाकरेंनी स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा घ्याव्यात ; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी आज ठाण्यात केलेल्या भाषणावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची नक्कल केली.
Jitendra Awhad : "माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. हो माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. परंतु, जो मस्ती करेल त्याच्यासमोर फणा काढला जाईल. स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा खाली आहेत, त्या जागा राज ठाकरे यांनी घ्याव्यात, अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
राज ठाकरे यांनी आज ठाण्यात केलेल्या भाषणावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची नक्कल केली. नागानं फणा काढावा, असा त्यांचा चेहरा आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शाहू, फुले आणि आंबेडकर यांची नावे घेतात परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, या राज ठाकरे यांच्या टीकेलाही जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. "शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांच्याच विचारांवर चालत होते, हे राज ठाकरे यांना माहीत नसावे. कारण त्यांनी बहुजन समाजाचा इतिहास वाचला नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणानंतर त्यांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. "2014 ला मोदींना पाठींबा, 2019 ला मोदींना विरोध. आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर. वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, पुतण्या बाळासाहेब ठाकरेंचा,मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
२०१४ला मोदींना पाठींबा, २०१९ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर,
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 12, 2022
वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची,
पुतण्या मा. बाळासाहेब ठाकरेंचा,मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी.
वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत..,पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं?: राज ठाकरे
- Raj Thackeray : मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत मुदत, ऐकला नाहीत तर.., राज ठाकरेंचा इशारा
- Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडीओ'; मशिदींच्या भोंग्यावर या आधीही आवाज उठवल्याचा दिला पुरावा
- समान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा करा; राज ठाकरेंची मोदींकडे मागणी