एक्स्प्लोर
जो वडिलांना विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार? : शिवसेना
जो वडिलांना विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार? असे म्हणत शिवसेनेनं निरंजन डावखरेंवर हल्ला चढवला. इशरत जहाँ प्रकरणात वसंत डावखरे यांनी तिच्या कुटुंबियांना मदत केली होती, आणि त्यांचाच मुलगा आता भाजपला उमेदवार म्हणून कसा चालतो? असा सवालही सेनेनं उपस्थित केला.

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अवघ्या काही तासांवर आलेली असताना शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. वडिलांमुळेच ज्यांना ओळख मिळाली ते भाजपचे निरंजन डावखरे प्रचारात वडिलांचं नाव कुठेही घेत नाहीत. त्यामुळं जो वडिलांना विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार? असे म्हणत शिवसेनेनं निरंजन डावखरेंवर हल्ला चढवला. इशरत जहाँ प्रकरणात वसंत डावखरे यांनी तिच्या कुटुंबियांना मदत केली होती, आणि त्यांचाच मुलगा आता भाजपला उमेदवार म्हणून कसा चालतो? असा सवालही सेनेनं उपस्थित केला. तर सेनेच्या या शाब्दिक हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भाजपनंही सेनेवर बोचरी टीका केली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खोटे आरोप करणं ही शिवसेनेची जुनी परंपराच असून सेना नेहमीच रडीचा डाव खेळते, अशी बोचरी टीका भाजपने केली. पालघरमध्येही शिवसेनेनं अशाचप्रकारे मुख्यमंत्र्यांची क्लिप दाखवली, मात्र शेवटी तेच तोंडावर पडले. तर इशरत जहाँला मदतीसाठी वसंत डावखरेंसोबत शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर पण गेले होते, ते सेनेला कसे चालतात? असा थेट प्रश्न भाजपने केला. निरंजन यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता, मात्र तो सफल न झाल्यामुळेच शिवसेनेना हा रडीचा डाव करत असल्याचे आरोपही भाजपनं केले.
आणखी वाचा























