(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत तर..., संजय राऊत थेटच बोलले
Shiv Sena Sanjay Raut On ST Strike : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे.
Shiv Sena Sanjay Raut On Sharad Pawar : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत तर हल्ल्यामागे अतृप्त आत्म्यांचा हात आहे, अशी खोचक टीका संजय यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्यासंदर्भात संजय राऊतांनी म्हटलं की, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्याला मी आंदोलन म्हणत नाही. यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे आहे, असे काही असे अस्वस्थ आणि अतृप्त आत्मे महाराष्ट्रात आहेत व त्यांच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहेत.
त्यांनी म्हटलं की, सतीश उके यांना अटक केल्यानंतर या लोकांना आनंद होतो. मुंबईतील एक वकील सदावर्ते यांना पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्रास होतो. दोघेही वकील, दोघांनाही समान न्याय पाहिजे. गेले काही दिवस भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यातील लोक कोणी विधान परिषदेत आहेत, कोणी रस्त्यावर आहेत. ते महाविकास आघाडीतील माननीय पवार साहेबांवर टीका करतात आणि आम्हाला भाषा विचारतात. तर आमची भाषा अशीच असेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुम्ही ज्या प्रमाणे शरद पवार यांच्यावर टीका टिप्पणी करत आहात. अशा प्रकारची भाषा वापरतात. म्हणजे तुमच्या संघाच्या शाखेमध्ये याच भाषेचे वर्ग घेतात का? साधनशुचिता असे शब्द वापरतात. ते कुठे गेले? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. महाराष्ट्राला ही घाण साफ करावी लागेल आणि आता ती वेळ आली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर नाही तर विरोधी पक्षातील काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर हल्लाबोल
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पोलिसांनी काय समन्स पाठवलेत, हे मला माहिती नाही. पण जबाबासाठी समन्स पाठवल्याचं कळतंय. त्याशिवाय, आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून कोट्यवधी गोळा करणारे दोघं बापबेटे पोलिसांसमोर जायला घाबरत आहेत. म्हणून ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आहेत. पण कर नाही तर डर कशाला ही तुमचीच भाषा आहे ना? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
राऊतांनी म्हटलं की, देश, देव आणि धर्म एकच आहे. हे देशासाठी गोळा केलेले पैसे होते. तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागेल. तुम्ही ते पैसे गोळा करून पचवलेत आणि ढेकर दिली आहे. आता तुमचं ऑपरेशन तर करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.
सेव्ह INS विक्रांत मोहिमेच्या पैसे लाटल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यासंदर्भात चौकशीसाठी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावण्यात आलं आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवळात ठेवलेल्या पेटीचाही हिशोब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनीही यांच्यावर कारवाई करायला हवी. तुम्ही आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून पैसे गोळा केले आहेत. 58 कोटी रुपये गोळा केले. हा पोलीस तपासाचा भाग आहे. तुम्ही पैसे गोळा केले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. धर्मादाय आयुक्तांनी देखील यांच्यावर कारवाई करायला हवी. त्यांच्या परवानगीशिवाय असे पैसे गोळा करता येत नाहीत. देवळात पेटी ठेवता त्याचा देखील हिशोब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो, असं राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी म्हटलं की, मला वाटतं किरीट सोमय्या अंडरग्राउंड झाले आहेत. त्यांना प्रश्न विचारले जातात तेव्हा ते त्याचं उत्तर देत नाहीत. उलटे-सुलटे उत्तरं देत आहेत. तुम्ही इतरांना प्रश्न विचारता आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न केले जातात, तेव्हा तुम्ही पळ काढत आहात. भूमिगत होत आहात. तुम्ही क्रांतिकारी आहात का? देशाला धोका देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घरात जाऊन अटक करायला हवी. इथे कायद्याचं राज्य आहे. कायदा यावर कारवाई करेलच, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :