आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला; राऊतांच्या आरोपांनंतर सोमय्यांचं स्पष्टीकरण
Kirit Somaya on Sanjay Raut Allegation : आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला. एवढ्या वेळात मी असे किती पैसे गोळा करु शकतो, असं किरीट सोमय्या म्हणाले.
Kirit Somaya on Sanjay Raut Allegation : राज्याच्या राजकारणात शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) संघर्ष शिगेला पोहोचला आहे. संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत फाईल उघडली आणि त्यानंतर किरीट सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. एकीकडे राऊतांकडून एकापाठोपाठ एक आरोपांचं सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या मात्र या आरोपांवर उत्तरं देणं टाळत आहेत. अशातच आज एबीपी माझाशी बातचित करताना या आरोपांचं खंडन केलं आहे. आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला. एवढ्या वेळात मी असे किती पैसे गोळा करु शकतो, असा सवालच किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला. एवढ्या वेळात मी असे किती पैसे गोळा करु शकतो. 10 डिसेंबर 2013 रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता फक्त. काँग्रेसनंही भिक मांगो आंदोलन केलं होतं. मग त्यांनी किती पैसे गोळा केले? असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. तसेच, मुंबई पोलीस ऐकीव माहितीवर एफआयआर कशी दाखल करू शकतात? एकही कागद नसताना त्यांनी एफआयआर कशी करून घेतली? असा सवालही किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांना केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी लोकांकडून जमा केलेला निधी किरीट सोमय्यांनी हडप केला आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्यांचा असा अपमान करणाऱ्या किरीट सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चार जोडे हाणले पाहिजे अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेला निधी किरीट सोमय्या यांनी हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी बुधवारी केला होता. राज्यपाल कार्यालयाकडून आलेल्या माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा आरोप केला. त्यानंतर आता शिवसेना-भाजप राजकीय संघर्ष आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले की, सोमय्या यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या अपमान केला असून त्यांची कृती देशद्रोहीपणाची आहे. मात्र, देशभक्तीचे गीत गाणारे, देशभक्तीचा दाखला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहीपणा करणाऱ्यांची बाजू घेतली. फडणवीस यांच्या या पावित्र्याने स्वर्गीय गोळवलकर गुरुजी, देवरस, रज्जू भैय्या, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल. मोहन भागवत यांनादेखील वाईट वाटत असेल असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :