एक्स्प्लोर
Advertisement
पवारांचं ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक : सामना
"महाराष्ट्रात सध्या जातीय ध्रुवीकरण करण्याचे अचाट प्रयत्न सुरु आहेत. शरद पवारांनी आता जे पगडी राजकारण सुरु केलं आहे, ते महाराष्ट्रासाठी घातक आहे” असं सामनातून म्हटलं आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेशवेकालीन पगडीला बाजूला सारुन फुले पगडी वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर, त्यांच्यावर शिवसेनेने सामना या मुखपत्रातून तोफ डागली आहे.
शरद पवारांचं ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक आहे, असं सामनात म्हटलं आहे.
‘सामना’त नेमकं काय म्हटलं आहे?
राष्ट्रवादीच्या पुण्यातील मेळाव्यात क्रांतिवीर छगन भुजबळ यांच्या डोक्यावर महात्मा फुले यांचे पागोटे घातले, तर शरद पवार यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तो जाणीवपूर्वक हाणून पाडला. हे ‘पगडी’नाटय़ जणू ठरवून एका विशिष्ट समाजाला संदेश देण्यासाठीच घडवून आणले. पुणेरी पगडी ही लोकमान्य टिळकांनी देशभर मिरवली. टिळक हे फक्त ब्राह्मण नव्हते तर भारतीय असंतोषाचे जनक आणि तेल्या-तांबोळय़ांचे पुढारी होते.
बहुजन समाजात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी राजे यांना स्वातंत्र्यलढ्याचे ‘नायक’ बनवून शिवजयंती उत्सव सुरू केला. जातीयतेविरुद्ध लढणारे व स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणा आधी असे सांगणाऱ्या आगरकरांच्या डोक्यावरही हीच पगडी होती. न्या. गोखले, चिपळूणकरही ‘पगडी’बहाद्दर होते. या पगडीस नकार देऊन श्री. पवार यांनी काय साध्य केले?
भटशाहीविरुद्ध प्रबोधनकार ठाकरे यांनीही लढे उभारले, पण त्यांनी ‘ब्राह्मण’ म्हणून एका जातीचा द्वेष केला नाही. पेशव्यांचे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे हे ब्राह्मण होते व ते मर्द होते. पवारांनी ‘पगडी’ नाकारून समाजात छेद निर्माण केला. खरे तर पवारांना मानाचा ‘फेटा’ही बांधता आला असता. तसे न करता आयोजकांनी ‘पगडी’ घालण्याचा प्रयत्न केला. कारण पटकथेतील प्रसंगानुसार ‘पगडी’ नाकारून पुणे – पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या मतदारांना संदेश द्यायचा होता. पवारांनी संदेश दिला. त्यामुळे पवारांचे नेतृत्व खुजे ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण असे वागल्याचे उदाहरण नाही. शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे.
पवारांचं राजकारण घातक
“कोरेगाव-भीमा दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्रात सध्या जातीय ध्रुवीकरण करण्याचे अचाट प्रयत्न सुरु आहेत. शरद पवारांनी आता जे पगडी राजकारण सुरु केलं आहे, ते महाराष्ट्रासाठी घातक आहे” असं सामनातून म्हटलं आहे.
या राजकारणापासून महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला पाहिजे असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे.
दंगलीशी संबंध नाही कशावरुन म्हणता?
याशिवाय दंगलीमागे शहरी नक्षलवाद होताच आणि त्याचे धागेदोरे हाती लागले आहेत. मात्र दंगलीमागचे जे सूत्रधार पकडले गेले त्यांचा दंगलीशी संबंध नाही असे लोक पकडले गेलेत असं पवार सांगतात ते कशाच्या आधारावर? तपासावर संशय व्यक्त करणे हे राज्याचे मुख्यमंत्रीपद तीन-चार वेळा भूषविलेल्या पवारांसारख्या नेत्यांना शोभत नाही, असंही सामनात म्हटलं आहे.
भीमा-कोरेगाव प्रकरणात महाराष्ट्र पेटला असताना श्री. पवार यांनी ‘कॅमेऱ्या’समोर येऊन शांततेचे आवाहन केले नाही, तर दंगलीमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे वक्तव्य करून भ्रम निर्माण केला. पवारांकडून जनतेची अपेक्षा अशी होती की, त्यांनी रस्त्यावर उतरून दंगलखोरांना शांत करायला हवे होते. मुंबईतील भीषण बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुख्यमंत्री असलेले पवार दुसऱया दिवशी शेअर बाजारात गेले व ‘बाजार’ सुरू केला, पण दंगलीनंतर त्यांनी महाराष्ट्राला सुरळीत करण्याचे प्रयत्न केले नाहीत व राज्य पेटू दिले, असं टीकास्त्र सामनातून सोडण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
पेशवेकालीन पगडी राष्ट्रवादीतून हद्दपार, यापुढे फुले पगडीनेच स्वागत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement