मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊ नयेत, याकडे पवारांनी लक्ष वेधले. याप्रकरणाची उचित चौकशी करुन निरपराध व्यक्तींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजातील नागरिकांना दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
मराठा आंदोलनावेळी कळंबोली आणि कामोठ्यातील मराठा समाजाच्या नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, नोकरदार महिला यांचा समावेश आहे. या वर्गाकडून अशा प्रकारचे गंभीर कृत्य होणे ही बाब पटण्यासारखी नाही. त्यामुळे हे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची चौकशी होऊन गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
कळंबोली आणि कामोठे येथील आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक झाली होती. तसेच पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्तांची चार ते पाच वाहनेही पेटवून देण्यात आली होती. पनवेल सायन महामार्गावर घडलेल्या या घटनेने दंगलीचे रुप प्राप्त झाले होते. हल्ल्यानंतर काही आंदोलकांवर पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा यासह दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. एकूण 20 हून अधिक तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हे दाखल झालेले सर्वजण सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र विनाकारण आमच्यावर हे गुन्हे दाखल केल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे.
शरद पवार दोन दिवसापूर्वी कामोठे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी हे गंभीर गुन्हे मागे घेण्याची विनंती मराठा समाजाच्या वतीने त्यांना करण्यात आली. या विनंतीवरुन शरद पवारांनी 29 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची यादी त्यांनी सोबत पाठविली असून त्यामध्ये मराठा समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनीअर असे सुशिक्षित लोक आहेत.
निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊ नयेत, याकडे पवारांनी लक्ष वेधले. याप्रकरणाची उचित चौकशी करुन निरपराध व्यक्तींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.