एक्स्प्लोर
पवार धर्मनिरपेक्ष, त्यांचा पक्ष नाही; राष्ट्रवादीत भिडेंची पिल्लावळ : आंबेडकर
तसंच एमआयएमबरोबर युती करुन निवडणूक लढवणारच. आता मागे फिरणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
मुंबई : शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत, मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. संभाजी भिडेंची पिल्लावळ राष्ट्रवादीत आहेत. उदयनराजे भिडेंची बाजू मांडतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास आम्हाला अडचण आहे. आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत, पण त्यांच्या मित्रांसोबत नाही, असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघाने राज्यात युती घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या युतीविषयी विचारलं असता प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत हे उत्तर दिलं.
तसंच एमआयएमबरोबर युती करुन निवडणूक लढवणारच. आता मागे फिरणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीत भिडेंची पिल्लावळ
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "2014 मध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपला पाठिंबा देण्यास तयार नव्हती. त्यावेळी आमदारांच्या दबावाखाली राष्ट्रवादीने सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला. संभाजी भिडेंची पिल्लावळ राष्ट्रवादीत आहे. उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार?
काँग्रेससोबत युतीसाठी तयार, पण...
"मात्र काँग्रेसबरोबर युती करण्यास आम्ही तयार आहोत, पण त्यांच्या मित्रांबरोबर नाही. काँग्रेससाठी दरवाजे उघडे आहेत. निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. पण राष्ट्रवादीसोबत जाणं आम्हाला मंजूर नाही. भाजपबरोबर जाणार नाही याची खात्री राष्ट्रवादीने काँग्रेसला दिली तर आम्ही विचार करु," असंही आंबेडकरांनी सांगितलं.
अहमदनगरमध्ये युतीचा पहिला प्रयोग
राज्यात एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाने युतीची घोषणा केली. प्रकाश आंबेडकर या युतीचं नेतृत्व करणार आहेत. ज्यात महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढतील. अहमदनगर महापालिकेत युतीचा पहिला प्रयोग केला. गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्र जाहीर सभा होणार आहे.
भागवतांच्या नव्या थिअरचा निषेध
‘बंच ऑफ थॉट्स’चे विचार तत्कालीन, "आता संयुक्तिक नाहीत, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाविषयी बोलताना आंबेडकर म्हणाले की, भागवतांनी लोकांना फसवण्यासाठी आम्ही बदललो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्ही मोहन भागवतांच्या नव्या थिएरीचा निषेध करतो. त्यांनी संविधानाची तत्वं मानलेली नाहीत. त्यांना गोळवलकर यांचे विचार मान्य आहेत. ते इथला कोणताही कायदा मानत नाहीत."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ज्यांच्या मार्गदर्शनानं पुढे गेली, त्या डॉ. गोळवलकर लिखित ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकापासून संघानं पहिल्यांदाच स्वतःला दूर केलंय. त्या पुस्तकातले संदर्भ तत्कालीन होते, ते विचार आता संयुक्तिक नाहीत, असं मोहन भागवत म्हणाले. पण हे पुस्तक संघाचं गोस्पेल असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement