(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनामुळे मागील वर्षापासून स्कूल बस थांबल्याने बसचे मालक, चालक, क्लीनर आर्थिक संकटात
कोरोनामुळे मागील वर्षापासून स्कूल बस थांबल्याने बसचे मालक, चालक, क्लीनर आर्थिक संकटात सापडले आहेत.मुंबईत जवळपास 24 हजार जणांचा यामुळे रोजगार बुडाला आहे.
मुंबई : शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या बसची चाके मागील एका वर्षापासून थांबली आहे. अशात बसचे मालक, चालक, क्लीनर आणि महिला सहाय्यकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मुंबईत 24 हजार जणांचा रोजगार बुडाला आहे. पुढील वर्षभर गाड्या सुरु होणार नसल्यानं इतर रोजगार करत या सर्वांना उदरनिर्वाह करावा लागतो आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करु देण्याची विनंती स्कूल बस असोसिएशनकडून केली जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा सर्व बंद आहे. ऑनलाईन क्लासेस सुरु असल्याने एका वर्षांहून अधिक काळ स्कूल बसेस जागेवर उभ्या आहेत. अशातच बसचे मालक, चालक, क्लीनर आणि महिला सहाय्यक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुंबईत तब्बल 24 हजार जणांवर यामुळे बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. त्याचसोबत बस मालकांवर बँकांच्या कर्जाचा डोंगर वाढत असल्यानं त्यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.
मागील एका वर्षापासून चालक, क्लीनर आणि महिला सहाय्यकांना इतर रोजगारावर आपलं पोट भरावं लागतं आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार शोधताना देखील अडचणी येत आहेत. त्याचसोबत एखाद्या दिवस काम मिळतं तर कधी उपाशी पोटी झोपावं लागतं आहे. चालकांना कधी काम मिळतं आहे तर कधी दुसऱ्या रोजगारावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे चित्र आहे. उदरनिर्वाहासाठी दुसरे पर्याय शोधत असताना कुणी भाजीपाला विकतंय, तर कुणी इडली-सांबार विकत आपला दिवस ढकलतायेत. त्यात पुढील वर्षभर पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील की नाही याची शाश्वती नसल्यानं अजून वर्षभर तरी गाड्या बंदच असणार आहे. अशात जगावं कसं असा प्रश्न या बस चालकांना पडला आहे.
सरकारकडून कोणत्याही प्रकारची अद्याप मदत मिळाली नाही. त्यात कर्जाचा डोंगर मोठा आहे. अशात बेस्टकडून जर शाळेच्या गाड्या पब्लिक वाहतूक करण्यासाठी घेण्यात आल्या तर अडचणी सुटतील. यात गाड्या देखील छोट्या असल्याने वाहतुकीस अडचण होणार नाही आणि बेस्टला देखील याचा फायदा होईल. यासाठी आम्ही अत्यंत कमी किमतीत ह्या गाड्या देऊ असं देखील स्कूल बस ओनर असोसिएशनकडून सांगण्यात येत आहे.
राज्यात 50 हजार स्कूल बसेस आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे मागील एका वर्षात या क्षेत्रातील दीड लाख लोकांना याचा फटका बसला आहे. अशात बसची चाकं पुन्हा नाही चालली तर बिघडलेल्या आर्थिक स्थितीत जगावं कसं असा प्रश्न या सर्वांकडून उपस्थित केला जातो आहे.