सचिन वाझेंनी आपल्याच सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले? साकेत सोसायटीमधील तीन पत्र पत्रव्यवहार एबीपी माझ्याच्या हाती
सचिन वाझे यांनी आपल्याच सोसायटीचे सीसीटीव्ही का जप्त केले असतील? त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीचा शोध लागू नये यासाठी त्यांनी असं केलं का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुंबई : एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सचिन वाझे यांचं घर असलेल्या ठाण्यातील साकेत सोसाटीमधील दोन डीव्हीआर ( डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर) मनसुख यांचा मृतदेह सापडण्यापूर्वीच जप्त करण्यात आले होते. मनसुख हिरण यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्रा खाडीत आढळून आला. मात्र साकेत सोसायटीमधले डीव्हीआर 27 फेब्रुवारीला ताब्यात घेण्यात आले होतं. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे यांनी जप्त केलेले पुरावे रेकॉर्डवर नसल्याचं कळतंय. या संपूर्ण प्रकरणात साकेत सोसायटीमधील तीन पत्र पत्रव्यवहार एबीपी माझ्याच्या हाती आले आहेत.
पहिलं पत्र
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू युनिटने साकेत सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्याचे फुटेज सोसायटीकडून मागितले होते. त्यासंदर्भात त्यांनी साकेत सोसायटीला पत्र लिहिले होते. मात्र पत्रावर कुठेही पोलीस सही शिक्का नसल्याने सोसायटीने त्या टीम मधल्या सर्वांची नावे, नंबर आणि सही त्या पत्रावर घेतली होती.
सचिन वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांना भोवणार? आयुक्तपदासाठी विविध नावं चर्चेत
दुसरे पत्र
साकेत सोसायटीला काहीसा संशय आल्याने 4 मार्चला याच सोसायटीने स्थानिक पोलीस स्टेशन असलेल्या राबोडी पोलीस स्टेशनला एक पत्र लिहिले आहे. ज्यात आमच्या सोसायटीचे सीसीटीव्ही सीआययू युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घेतले असल्याची तुम्हाला माहिती व्हावी म्हणून पत्र देतोय असं म्हटलं आहे.
तिसरे पत्र
हे पत्र ठाणे एटीएसने लिहिले आहे. ज्यात साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही आम्हाला हवे असून 17 फेब्रुवारी रात्री 12 पासून, 25 फेब्रुवारी रात्री 11 पर्यंत आम्हाला फुटेज हवे असल्याचे सांगितले आहे. मात्र एटीएसला ते मिळाले नाहीत. कारण डीव्हीआर आधीच सीआययूने नेले होते.
Antilia Bomb Scare: सीसीटीव्हीत दिसलेली पीपीई किट घातलेली व्यक्ती सचिन वाझे असल्याचा NIA ला संशय
सचिन वाझे यांनी आपल्याच सोसायटीचे सीसीटीव्ही का जप्त केले असतील? त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीचा शोध लागू नये यासाठी त्यांनी असं केलं का? मनसुख हिरण किंवा या केसमधील अन्य लोक त्यांना भेटायला येथे आलेले होते का? त्यांच्या सोसायटी मध्येच ती स्कॉर्पियो, इनोव्हा लपवून ठेवली होती का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Exclusive : ...म्हणून सचिन वाझेंना अटक, इनोव्हाच्या नंबर प्लेटचा झोल? CCTVमधून महत्वाची माहिती
सचिन वाझेंनी जप्त केलेले पुरावे रेकॉर्डवर नाहीत?
सचिन वाझे यांनी तपासाच्या नावाखाली ठाण्यातील दुकानदाराची डायरी, रेकॉर्ड्स, सीसीटीव्हा फुटेज जप्त केले होते. मात्र या वस्तू कायद्यानुसार त्यांनी रेकॉर्डवर घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसुख हिरण प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असताना, गाडीत सापडलेल्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सदगुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा कोणताही रेकॉर्ड ठेवण्यात आला नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दुकानदाराने वाझे आणि त्याच्या पथकाने दुकानातील CCTV, डीव्हीआर मशीन, रेकॉर्ड नेल्याचे कबूल केलं आहे. या संपूर्ण घटनेची आता गंभीर दखल ही घेण्यात आली असून या प्रकरणी CIU च्या अधिकाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. तर काही बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांची चर्चाही रंगली आहे.