(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केडीएमसी क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीस आजपासून सुरुवात; योग्य काम करण्यासंदर्भात कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्तांचा इशारा
खड्डे तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे भरले गेले नाहीत तर संबंधित कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकणार. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
कल्याण : पावसाने उसंत घेतल्याने आजपासून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला केडीएमसीला मुहूर्त सापडला आहे. कल्याण डोंबिवली शहरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती आजपासून सुरू करण्यात आली आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खड्डे तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे भरले गेले नाहीत तर संबंधित कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच जबाबदार अधिकारी अभियंते यांच्या विरोधातही कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण डोंबिवली शहरात मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात अक्षरशः चाळण झाली. खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांसह राजकीय पक्षांनी तक्रारी, निवेदने, आंदोलने करून देखील खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तीन दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर आज महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसर, खडक पाडा, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम याठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. यावेळी केडीएमसीच्या शहर अभियंत्या सपना कोळी यांनी कामाची पाहणी करत डांबराचे तापमान तपासण्यात आले. तसेच काही सॅम्पल्स घेऊन तपासणी केली. महिनाभरात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल व खड्डेमुक्त रस्ते असा दावा महापालिकेने केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांनी सांगितले की, महापालिका दरवर्षी खड्डे बुजवण्याचे काम करते. खड्डे बुजवण्याचे काम गतवर्षी देखील केले होते. त्यापैकी 70 रस्त्यावर खड्डे पडले नसून रस्ते सुस्थितीत आहेत. पुढे बोलताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी म्हटलं की, तांत्रिकदृष्ट्या खड्डे योग्य प्रकारे भरले गेले पाहिजेत. डांबराचे तापमान चेक केलं पाहिजे. खड्डा भरण्यापूर्वी तो हायड्रोलिक पद्धतीने ड्राय केला गेला पाहिजे. त्यानंतर त्यावर डांबरमिश्रित खडी टाकली गेली पाहिजे.
ज्या ठेकेदाराला खड्डे भरण्याचे काम दिले आहे. त्याच्याकडून तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे खड्डे भरण्याचे काम केले गेले नाही तर संबंधित ठेकेदाराला काळ्य़ा यादीत टाकले जाणार असल्याचे सांगितले. तसेच खड्डे भरण्याच्या कामाची जबाबदारी महापालिकेच्या ज्या अधिकारी आणि अभियंत्यावर दिलेली आहे त्याच्याकडून योग्य प्रकारे देखरेख ठेवली गेली नाही तर संबंधित अधिकारी आणि अभियंते यांच्या विरोधातही कडक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.