Ravindra Waikar : 'राजकीय दबाबतून ही कारवाई', रवींद्र वायकरांची तब्बल 9 तास सुरु होती ईडी चौकशी
Ravindra Waikar : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं. त्यानंतर आज वायकरांची ईडी चौकशी करण्यात आली.
मुंबई : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आल्यानंतर सोमवार 29 जानेवारी वायकर हे ईडी चौकशीसाठी हजर राहिले. चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडून वायकरांना तिनदा समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु आरोग्याच्या कारणास्तव वायकर हे सुरुवातीला ईडी चौकशीला हजर राहिले नाही. परंतु तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर वायकरांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. ही चौकशी राजकीय दबावामुळे सुरु असल्याची प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी यावेळी दिली.
तसेच यावेळी वायकरांनी त्यांच्या चौकशीमधील महत्त्वाचे मुद्दे सांगितले. जेव्हा ईडीचे अधिकारी चौकशीसाठी घरी आले, त्यावेळी त्यांनी माझ्याकडे 19 वर्षांची कागदपत्रे मागितली. ज्यावेळी मी सुप्रीमो अॅक्टिविटी सेंटर बांधलं, तेव्हापासून म्हणजेच 2002 पासूनची कागदपत्रे मला सादर करण्यास सांगितली. पण मी इतक्या वर्षांची कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितला होता, माझी तब्येत बरी नव्हती, हा वेगळा मुद्दा असला तरीही मला वेळ वाढवून देण्यात आला नाही, असं स्पष्टीकरण रवींद्र वायकरांनी दिलं.
वायकरांनी मांडला हिशोब
जी नोटीस आम्हाला बजावण्यात आली तिला आम्ही न्यायालयात देखील आव्हान दिलं. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. पण त्याआधी जे आरोप झाले त्यात त्यांनी म्हटलं की, तुम्ही कोट्यवधी कमवले. तक्रारदारांनी दावा केलाय की, आम्ही 500 कोटींचा घोटाळा केला. पण आम्हाला गेल्या 19 वर्षात फक्त 32 ते 36 कोटींचा फायदा झालाय. त्यातले 20 कोटी कामगारांचे पगार देण्यावर खर्च झालेत. त्यामुळे आम्हाला 11 कोटी मिळाले. आम्ही पाच जण होतो. त्यामध्ये प्रत्येकाला 1 कोटी 22 लाखांचा फायदा झाला. बाकीचे जे 5 कोटी आहेत, पंजाब-महाराष्ट्र बँकेत आहेत, असा सगळा हिशोब वायकरांनी माध्यमांसमोर मांडला.
म्हणून वेळ लागणार होता - रवींद्र वायकर
आयकर विभागाच्या नियमांनुसार कोणत्याही मालमत्तेचा सात वर्षांचा तपशील द्यावा लागतो. पण त्यांनी माझ्याकडे 19 वर्षांचा तपशील मागितला. त्यामुळे मला कागदपत्र सादर करण्यास वेळ लागणार होता. पण त्यांनी मला समन्स बजावल्यानंतर मी आज चौकशीसाठी आलो आहे. मी जे क्लब बांधलं होतं, त्याला ओसी वैगरे सगळं होतं,तरीही मुंबई महापालिकेच्या माध्यामातून माझ्यावर बांधकामाची तक्रार करण्यात आली. नवीन डीसीआर आल्यानंतर त्याच्या माध्यमातून दोन वर्ष बांधकामाचं काम झालं. पण राजकीय दबावातून आणि आयुक्तांच्या माध्यमातून ते बांधकाम बंद करण्याची नोटीस देण्यात आली, असंही वायकरांनी म्हटलं.
प्रकरण नेमकं काय?
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.
ही बातमी वाचा :
महाविकास आघाडीचे ठरलं! मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील जागावाटप समोर, कोणाला किती जागा?