(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राणा दाम्पत्य उद्या हनुमान चालीसा पठण करणार, 'मातोश्री'बाहेर बॅरिकेडिंग करुन पोलीस बंदोबस्तात वाढ
Ravi Rana Hanuman Chalisa : आमदार रवी राणा आज (22 एप्रिल) अमरावतीमधून निघणार असून उद्या (23 एप्रिल) मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे इथला 'मातोश्री' निवासस्थाना बाहेर येऊन हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्धार आमदार रवी राणा यांनी यांनी व्यक्त केला. 23 एप्रिल रोजी रवी राणा मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं वाचन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर 'मातोश्री' बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी मध्यरात्री मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केली आहे.
जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण केलं नाही तर आपण मातोश्रीसमोर जाऊन पठण करु असं आव्हान आमदार रवी राणा यांनी दिलं होतं. त्यानुसार आमदार रवी राणा आज (22 एप्रिल) अमरावतीमधून निघणार असून उद्या (23 एप्रिल) मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यांच्यासोबत सुमारे 600 हून अधिक कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमणार आहे. त्यामुळे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मातोश्री बाहेर मोठा फौजफाटा तैनात केला असून बॅरिकेडिंग केलं आहे.
राणा दाम्पत्याला मुंबईला जाऊ देणार नाही : शिवसेना
राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी आक्रमक झाली आहे. आमदार रवी राणा यांना मुंबईला जाऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून शिवसैनिक मोठ्या संख्येने बडनेरा रेल्वे स्टेशनवर हजर राहतील. सोशल मीडियाद्वारे रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आज रात्री आठ वाजता अमरावतीहून मुंबईला निघणार आहेत.
रवी राणा यांचा निर्धार
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात संकटं वाढली आहेत. मुख्यमंत्री घरातून बाहेर निघत नाहीत. संकटांमधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसा वाचावी, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं. मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु. आम्ही शांतपणे जाऊन हनुमान चालीसाचं वाचन करु, वेळ असल्यास मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला मोठ्या मनाने साथ द्यावी, असंही रवी राणा म्हणाले.
हनुमान चालीसा वाचण्यासाठी महाविकास आघाडीची परवानगी घ्यावी लागते का? असा सवालही रवी राणा यांनी उपस्थित केला. आम्ही अत्यंत श्रद्धेने मातोश्रीची वारी करणार आहोत. अनेक संकटांना सामना करण्याची आमची तयारी आहे, आम्ही जाणार म्हणजे जाणारच असा निर्धारही राणा यांनी बोलून दाखवला. रवी राणा यांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी 23 एप्रिलचा मुहूर्त
आमदार रवी राणा 23 एप्रिलला 'मातोश्री' निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यांच्यासोबात 600 हून अधिक कार्यकर्ते हे मातोश्रीसमोर जमणार आहेत. या आधी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने मातोश्रीसमोर गर्दी केली होती. पण राणा दाम्पत्य काही आलं नाही. आता आमदार रवी राणांचा मातोश्री समोरील हनुमान चालीसा पठणाचा मुहूर्त ठरला असून 23 एप्रिल रोजी ते मुंबईत येणार आहेत.
मातोश्रीवर जाण्यासाठी अमरावती पोलिसांनी मला रोखू नये : नवनीत राणा
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मला मुंबईत येऊन दाखवण्याचे आव्हान शिवसैनिकांनी दिलं होतं. दोन-तीन दिवस वाट बघूनही त्यांच्याकडून तारीख आणि वेळ मात्र काही सांगण्यात आली नाही. उद्धव ठाकरे यांचा हनुमान चालीसाला इतका विरोध का? हे समजायला मार्ग नसल्याचे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. आम्ही म्हटल्याप्रमाणे मातोश्रीवर जाऊ आणि हनुमान चालीसा वाचन करु असंही त्या म्हणाल्या. मातोश्रीवर जाण्यासाठी अमरावती पोलिसांनी मला रोखण्याचे कृत्य पुन्हा करु नये. आम्ही शांततेच्या मार्गाने जात आहोत आम्हाला जाऊ देण्यात यावं, असंही राणा म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
- Ravi Rana : अमरावती ते मातोश्री वारी करुन हनुमान चालीसाचे वाचन करणारच, वेळ असल्यास मुख्यमंत्र्यांनीही साथ द्यावी : रवी राणा
- Ravi Rana : रवी राणांचा मुहूर्त ठरला, 23 एप्रिलला 'मातोश्री' समोर हनुमान चालिसा पठण करणार
- स्थायी समितीच्या अध्यक्षांची प्रॉपर्टी विका आणि शेतकऱ्यांना पैसे द्या: देवेंद्र फडणवीस