Sanjay Raut : राहुल गांधींच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी खुलासा करावा; चीनी घुसखोरीवर खासदार संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा
Rahul Gandhi Statement : राहुल गांधी सध्या लेह-लडाख दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी लडाखमध्ये चिनी घुसखोरीचा दावा केला आहे. चीन अरुणाचल प्रदेशपर्यंत आतमध्ये पोहोचल्याचंही बोललं जात आहे.
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चीनच्या घुसखोरी (China Invasion In India) बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांशी सहमत असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi In Ladakh) यांनी पॅंगॉन्ग तलावाच्या काठावर पोहोचून वडील राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली, यानंतर त्यांनी लडाखमध्ये चिनी घुसखोरीचा दावा केला. 'आपल्या देशातील जमिनीतर कुणी घुसखोरी करत असेल, तर जनतेला त्यामागील सत्य जाणून घ्यायचा अधिकार आहे आणि राहुल गांधी यांनी तोच मुद्दा समोर आणला आहे', असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
'राहुल गांधी सत्य बोलत आहेत'
संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, राहुल गांधी आपले नेते संसदेमध्ये भूमिका मांडत असतात. गेल्या दोन दिवसांपासून ते लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. लेहपासून लडाख त्यांनी मोटरसायकलने प्रवास केला. यावेळी त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या देशात चीनने घुसखोरी केली आहे. हे आम्हीही सांगितलं आहे. यावर आम्ही अनेकदा संसदेमध्ये चर्चाही मागितली आहे. मणिपूरप्रमाणे ती चर्चाही नाकारण्यात आली. राहुल गांधी खोटं बोलत नाहीयत.
'पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी खुलासा करावा'
चीनच्या घुसखोरीबाबत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहे, त्यांच्यावर देशाचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री प्रामाणिकपणे खुलासा करण्याची गरज आहे. मी असं बोलणार नाही की, या देशाचे राज्यकर्ते खोटं बोलतायत पण, ते काहीतरी लपवत आहेत. त्यांनी लपवाछपवी करु नये. मी असं म्हणणार नाही की, ते बेईमानी करतायत पण ते नाइंसाफी करतायत, चुकीचं वागतायत', असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
चीननं आपली जमीन बळकावली आहे : राहुल गांधी
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लडाखमध्ये चीननं आपली जमीन बळकावली आहे, तेथी लोकांनी मला सांगितलं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लडाखमध्ये चिनी सैन्य घुसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान सत्य लपवतं आहे, चीननं आपली जमी बळकावलीय. लडाखमध्ये प्रत्येकजण हेच सांगत आहे. एक इंचही जमीन गेलेली नाही, असं पंतप्रधान म्हणतायत, पण ते सत्य नाही. ते खरं लपवत आहेत. तुम्ही लडाखमधील लोकांना विचारा, ते तुम्हाला खरं सांगतील." असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारला घेरलं आहे.