काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा
युतीत शिवसेना-भाजप 135-135 जागा आणि घटक पक्षांना उर्वरित 18 जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हा फॉर्म्युला निश्चित झाल्यास भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदारांना स्थान मिळणार का याबाबत संभ्रम कायम आहे.
मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने माझी कोंडी केली असून आता पक्षात माझी घुसमट होत आहे. आज विधानसभा अध्यक्षकडे राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
इतर आमदार भेटत राहतात, माझ्यासोबत राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मात्र आज मी एकटा राजीनामा देणार आहे, असं राधाकृष्ण विखे पाटलांची स्पष्ट केलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढा खासदार रणजित निंबाळकर यांच्यात आज बैठक पार पडली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली.
मात्र भाजपच्या वाटेवर असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. युतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदारांना शिवसेना जागा सोडणार का? राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत 10 ते 12 बंडखोर आमदारांना युतीच्या जागावाटपात स्थान मिळणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
युतीत शिवसेना-भाजप 135-135 जागा आणि घटक पक्षांना उर्वरित 18 जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हा फॉर्म्युला निश्चित झाल्यास भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदारांना जागावाटपात स्थान मिळणार का याबाबत संभ्रम कायम आहे. यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
VIDEO | विखेंसोबत कॉंग्रेसचे कोणते नेते भाजपात जाणार?
काय आहे विधानसभेच्या जागावाटपांचा पेच?
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 122 आमदार निवडून आले. तर एकूण 6 अपक्ष आणि 1 रासप असे एकूण 129 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. येत्या विधानसभेत 135 पैकी भाजप 129 जागा लढणार असल्यास नव्याने पक्षप्रवेश करणाऱ्या आमदारांना उर्वरित 6 जागाच भाजप सोडू शकते. त्यातही काही जागा या पारंपरिक शिवसेनेच्या असल्याने शिवसेनेकडून याबाबत अध्याप कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील बंडखोर आमदार राजीनामा द्यायला तयार नसून भाजपातील पक्षप्रवेश लांबणीवर पडण्याचे चिन्ह आहेत.
काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा वडाळा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचा माण-खटाव मतदारसंघातून शिवसेनेच्या कोट्यातला आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार लढत असलेला आहे. त्यामुळे शिवसेना या जागा नव्याने भाजपमध्ये आलेल्यांसाठी सोडणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
VIDEO | रोहित पवारसोबत कुठलंही वैर नाही, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध : सुजय विखे