आरोपींना शिक्षा होईल ती खरी श्रद्धांजली असेल, लोकल साखळी बॉम्बस्फोटातील मृतांच्या नातेवाईकांची तीव्र प्रतिक्रिया
11 जुलै 2006, संध्याकाळी 6.24 ते 6.35 या 11 मिनिटांच्या काळात 7 बॉम्ब मुंबई लोकलमध्ये फुटले आणि मुंबईकरांचे आयुष्य बदलले. त्या 11 मिनिटात 209 निष्पाप मुंबईकर जीवानिशी गेले.
मुंबई : मुंबई लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटाला आज 15 वर्ष उलटली. मात्र एवढ्या वर्षांनंतररी आरोपींना शिक्षा झालेली नाही. ज्यावेळी आरोपींना शिक्षा होईल त्याचवेळी आम्ही खरी श्रद्धांजली वाहू, अशी तीव्र प्रतिक्रिया साखळी बॉम्बस्फोटातील मृतांच्या नातेवाईकांनी दिली आहे. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 209 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर शेकडो जण जखमी झाले. त्या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाली.
11 जुलै 2006, संध्याकाळी 6.24 ते 6.35 या 11 मिनिटांच्या काळात 7 बॉम्ब मुंबई लोकलमध्ये फुटले आणि मुंबईकरांचे आयुष्य बदलले. त्या 11 मिनिटात 209 निष्पाप मुंबईकर जीवानिशी गेले. 800 पेक्षा जास्त मुंबईकर जखमी झाले. अनेकांनी कायमचे हात पाय गमावले. मात्र आज 15 वर्षांनंतर देखील त्या जखमा भळभळत्या आहेत. तो क्षण अजूनही आठवून पीडितांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
अनेकांचे प्राण गेले आणि जे दिव्यांग झाले त्याचे दुःख आहेच. पण 15 वर्ष झाली त्या नराधमांना अजूनही शिक्षा झाली नसल्याचे दुःख जास्त आहे असे हे पीडित सांगतात. या पीडितांचे दुःख मोठे आहे, कारण त्यानंतर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी आज भारताने यमसदनी पाठवलेत. मात्र लोकल हल्ल्यातील आरोपी अजूनही सरकारी पाहुणे बनून तुरुंगात आहेत.
हल्ल्यात मृत झालेल्याच्या नातेवाईकांना आणि जाखमींना आजही न्यायाची अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे. मात्र न्यायायलीन प्रक्रिया रेंगाळली असल्याने अजून काही वर्षे तरी त्या दहशवाद्यांना सरकारी पाहुणचार मिळणार अशीच चिन्हे आहेत.
कटू आठवणी! 11 जुलै 2006... सात ठिकाणी बॉम्बस्फोट! मुंबईची लाईफलाईन याच दिवशी हादरुन गेली होती...
बॉम्बस्फोटाचा योजनाबद्ध कट
या बॉम्बस्फोटासाठी ‘सिमी’ आणि ‘लष्कर’ या अतिरेकी संघटनांनी योजनाबद्धरीत्या तयारी करुन हे स्फोट घडवून आणले. घटनेनंतर एटीएसनं 13 जणांना अटक केली. एटीएसकडून अटकेतल्या 13 आणि फरार 15 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2015 रोजी खास न्यायालयाने 13 आरोपींना दोषी ठरवले आणि 30 सप्टेंबर 2015 रोजी न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दिकी, नावेद हुसेन खान,असिफ खान या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख,सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली.