Dadar: 'फिरुनी जुळल्या रेशीमगाठी' घटस्फोटापासून परावृत्त झालेल्यांचा मेळावा; ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंची हटके संकल्पना
घटस्फोटापर्यंत पोहोचून देखील तो न घेता पुन्हा नव्यानं संसाराला सुरुवात करणाऱ्या जोडप्यांसाठी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये (Ashok Mulye) यांनी एका हटके मेळाव्याचे आयोजन केले होते.
Dadar: लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात, असं म्हटलं जातं. पण सध्या वैचारिक मतभेद, स्वभावातील फरक अशा अनेक कारणांमुळे या रेशीमगाठी सोडण्याचा निर्णय अनेक जोडपी घेत आहेत. घटस्फोटापर्यंत पोहोचून देखील तो न घेता पुन्हा नव्यानं संसाराला सुरुवात करणाऱ्या जोडप्यांसाठी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये (Ashok Mulye) यांनी एका हटके मेळाव्याचे आयोजन केले होते.
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंच्या हटके संकल्पनेतून नुकताच 'फिरुनी जुळल्या रेशीमगाठी' या नावाचा आगळावेगळा मेळावा पार पडला. दादरच्या (Dadar) सावरकर स्मारकातील तळमजल्यावरच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. घटस्फोटापर्यंत पोहोचून देखील तो न घेता पुन्हा एकदा आयुष्य एकमेकांच्या साथीने पुढे नेणाऱ्या आणि सध्या सुखी संसार करणाऱ्या दाम्पत्यांसाठी मेळाव्याचं आयोजन अशोक मुळ्ये यांनी केले.
घटस्फोटापर्यंत पोहोचून देखील तो न घेता सुखी संसार करणारी 18 जोडपी 'फिरुनी जुळल्या रेशीमगाठी' या मेळाव्यात उपस्थित होती. अशा प्रकारचं अशोक मुळ्ये यांनी आयोजित केलेलं हे तिसरं संमेलन आहे. 18 दाम्पत्यांसोबतच 12 नवविवाहित जोडप्यांना देखील अशोक मुळ्ये यांनी या कार्यक्रमाल निमंत्रित केली होतं. नवविवाहितांना आयुष्य पुढे नेताना सर्वसमावेशक विचार करुन वाटचाल करता यावी, नातं टिकवता यावं, यासाठी अशा नव्याने लग्न झालेल्या दाम्पत्यांनाही अशोक मुळ्ये यांनी निमंत्रित केलं.
प्रशांत दामले देखील होते उपस्थित
कार्यक्रमाची सुरेल सुरुवात 'या सुखांनो या' या अशोक मुळ्ये यांच्या आवडत्या गीताने झाली. सुप्रसिद्ध गायिका केतकी भावे-जोशीेने (Ketaki Bhave Joshi) हे गीत सादर केलं. कार्यक्रमाला ख्यातनाम अभिनेते प्रशांत दामलेंची (Prashant Damle) खास उपस्थिती होती. उपस्थित दाम्पत्यांना त्यांनी आपल्या खास शैलीत नातं टिकवण्यासाठी मार्गदर्शन केलं. तसंच अशोक मुळ्ये यांनी देखील आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत उपस्थितांची दाद मिळवली.
इतर मान्यवरांची उपस्थिती
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अंजली जोशी, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ठाणे फॅमिली कोर्टाचे (Thane Family Court) मुख्य न्यायमूर्ती श्याम रुकमे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी उपस्थित जोडप्यांना मार्गदर्शनही केलं. समुपदेशक वंदना शिंदे आणि वांद्रे फॅमिला कोर्टाचे (Bandra Family Court) शशांक मराठे यांच्या प्रमुख सहकार्याने अशोक मुळ्ये यांनी हा मेळावा घडवून आणला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :