मी ज्ञानदेवच...! समीर वानखेडेंच्या वडिलांचा दावा, पण बायको प्रेमाने दाऊद म्हणायची
सर्विस बुकवर माझ्या नावाची ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. माझ्या सर्व शासकीय कागदपत्रांमध्येही नावाची नोंद ज्ञानदेव वानखेडे अशीच आहे, अशी माहिती समीर वानखेडेंच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Nawab Malik VS Sameer Wankhede : मुंबई क्रूझ ड्रग्स केस प्रकरणानं सध्या राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणात केल्या जाणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रांमुळे संपूर्ण प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलं आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक याप्रकरणी माध्यमांसमोर अनेक दावे करत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामाही ट्विटरद्वारे जारी केला आहे. अशातच याप्रकरणी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
सर्विस बुकवर माझ्या नावाची ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. माझ्या सर्व शासकीय कागदपत्रांमध्येही नावाची नोंद ज्ञानदेव वानखेडे अशीच आहे, अशी माहिती समीर वानखेडेंच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत बोलताना समीर आणि त्याच्या पत्नीचं लग्न मुस्लीम पद्धतीनं झालं. परंतु, काही काळानं त्यांच्यात काही वाद झाले, आणि त्यानंतर त्यांचा कायदेशीर पद्धतीनं घटस्फोट झाला, अशी माहिती समीर वानखेडे यांच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच यावेळी बोलताना या ड्रग्ज प्रकरणाशी माझा, माझ्या जातीचा, धर्माचा, नावाचा काय संबंध हे मला नवाब मलिक यांनी सांगावं, असा प्रश्नही त्यांवी विचारलाय.
समीर वानखेडेंचे वडिल बोलताना म्हणाले की, "निकाहनामा खरा असेल मात्र त्यावेळी समीरच्या आईनं काय सांगितलं हे मला माहिती नाही. पण मुस्लिम धर्मात जर दोन लोकं वेगळ्या धर्माचे असतील तर त्यांच लग्न होत नाही, म्हणून कदाचित समीरच्या आईनं त्यावेळी काही सांगितलं असेल पण ते मला माहिती नाही. लग्न व्हावं म्हणून समीरच्या आईनं केलं असावं पण मला माहिती नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "फेसबुक अकाउंट जे दाऊद वानखेडे नावानं होतं ते माझं नव्हतं. ते खोट्या पध्दतीनं बनवण्यात आलं आहे. लोक प्रेमानं कुठल्याही नावाने हाक मारतात. समीरने कोणाचा हक्क मारून नोकरी मिळवली नाही, आम्ही स्वत: त्या धर्माचे आहोत." त्यासोबतच मी कोर्टात जाणार आहे आणि नवाब मलिक यांच्यावर दावा ठोकणार आहे, असंही समीर वानखेडेच्या वडिलांनी सांगितलं आहे.
मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच; समीर वानखेडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. अशातच अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या प्रकरणी दररोज नवनवे दावे करत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामाही ट्विटरद्वारे जारी केला आहे. अशातच याप्रकरणी समीर वानखेडे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच आहे, असं म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांनी एबीपी माझाला माहिती देताना म्हटलं आहे की, "हो, मी मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं कारण माझ्या आईची तशी इच्छा होती. माझी आई जन्मानं मुस्लिम होती आणि तिनं माझ्या वडलांशी लग्न करून हिंदू धर्म स्वीकारला होता. मी सेक्युलर व्यक्ती आहे. मी ईदही साजरी करतो आणि दिवाळीही साजरी करतो. मी मंदिरातही जातो आणि मशिदीतही जातो. मी आईच्या इच्छेनुसार, मुस्लिम धर्माच्या रितीप्रमाणे लग्न केल्यानंतर स्पेशल मॅरेज एक्टप्रमाणे लग्न रजिस्टर केलं आहे. म्हणून हा काही गुन्हा झाला का?" पुढे बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, "माझ्याविरोधात केले जात असलेले आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत. मी धर्म बदलला आहे का? मी जन्माने हिंदू होतो आणि आताही हिंदू आहे. मुस्लिम मुलीशी लग्न केल्यानं मी मुस्लिम होतो का?"