एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गटारीमुळे कल्याण-डोंबिवलीत खड्डेभरणीचं काम बंद : पालिका आयुक्त
गटारी असल्यानं खड्डेभरणीचं काम बंद असल्याचं अजब कारण देत कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी नवीन वादाला तोंड फोडलं.
कल्याण : गटारी असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत खड्डेभरणीचं काम बंद आहे, असं अजब वक्तव्य कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी केलं आहे. केडीएमसीच्या महासभेत आज नगरसेवकांनी प्रशासनाला खड्ड्यांवरुन धारेवर धरल्यानंतर बोडके यांनी हे विधान केलं.
कल्याण-डोंबिवलीत खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झाले असून आतापर्यंत पाच जणांचे बळी गेले आहेत. यावरुन केडीएमसीच्या मागच्या महासभेत प्रचंड गदारोळ झाला होता. शेवटी ही महासभा तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब महासभा आज पुन्हा सुरु झाली.
सभेत पुन्हा एकदा सगळ्याच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत खड्डेभरणी सुरु नसल्याचा आरोप केला. त्यांना उत्तर देताना आयुक्तांनी आज गटारी असल्यानं काम बंद असल्याचं अजब आणि धक्कादायक कारण दिलं. महासभा तहकूब झाल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा हेच कारण देत अकलेचे तारे तोडले.
या महासभेत सुरुवातीला विरोधीपक्षात असलेल्या मनसेने सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. मागील सभेत राजदंड पळवणारे मनसे गटनेते प्रकाश भोईर यांचं महापौरांनी एका महासभेसाठी निलंबन करत असल्याची घोषणा केली. यावरुन मनसेने शिवसेनेला धारेवर धरत सभागृहात ठिय्या आंदोलन करणाऱ्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांचंही निलंबन करण्याची मागणी केली.
या महासभेत सत्ताधारी शिवसेनेनेही प्रशासनावर हल्ला चढवला. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना काम करण्याची इच्छाच राहिली नसून केवळ पाट्या टाकण्याची कामं होत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केली. शिवाय यापुढे गळ्यात पाटी घालून सभागृहात येण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या सगळ्यांना उत्तर देताना आयुक्त गोविंद बोडके यांनी खड्डेभरणीचं काम सुरु असल्याचं सांगितलं, मात्र आज गटारी असल्यानं काम बंद असल्याचं अजब कारण देत त्यांनी नवीन वादाला तोंड फोडलं. आता गटारी हा काही राष्ट्रीय सण नाही, किंवा बँक हॉलिडेही नाही, हे बहुधा आयुक्त महोदय विसरले असावे. मात्र आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून असं बेजबाबदार विधान करण्यात आल्यानं कल्याणमध्ये गेलेल्या पाच बळींचं केडीएमसी प्रशासनाला गांभीर्य नसल्याचंच पाहायला मिळालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement