वर्षा बंगल्यातील भिंतींवर लिहिलेल्या वाक्यांवरुन राजकारण, भिंतीवर 'यूटी वाईट' असा उल्लेख
वर्षा बंगल्यातील भिंतींवर लिहिलेलं यूटी म्हणजे नेमकं काय अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कुठलीही वाक्य लिहिली नसल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : 'वर्षा' बंगल्यातील भिंतीवर लिहिलेल्या वाक्यांवरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. वर्षा बंगल्याच्या आतील भिंतींवर भाजप रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स असे शब्द लिहिलेले दिसत आहेत. या भिंतींवर लिहिलेल्या मजकुराचा व्हिडीओही समोर आला आहे. भिंतींवरील काही वाक्यांमध्ये यूटी वाईट आहेत (UT is mean), असा उल्लेख करण्यात आला आहे. यूटी म्हणजे नेमकं काय अशा चर्चांना त्यामुळे सुरुवात झाली आहे.
गलिच्छ आणि खालच्या पातळीचं हे राजकारण : देवेंद्र फडणवीस
दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कुठलीही वाक्य बंगल्यातील भिंतींवर लिहिली नसल्याचं म्हटलं आहे. जेव्हा बंगला सोडला तेव्हा भिंतीवर काहीच लिहिलेलं नव्हतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. अत्यंत गलिच्छ आणि खालच्या पातळीचं हे राजकारण आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सध्या सुरु असलेल्या चर्चा ऐकून आश्चर्य वाटलं. वर्षा बंगला सोडून जवळपास महिना उलटला आहे. बंगला सोडताना सर्व नीट तपालसं होतं. वर्षा बंगला सोडल्यानंतर पुन्हा एकदाही तेथे आम्ही गेलेलो नाही. वर्षातील भिंतींवर काहीही लिखाण दिविजा (मुलगी) किंवा कुणी केलेलं नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
वर्षा बंगले के कमरे के दीवार पर महारष्ट्र के नए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के खिलाफ अपशब्द लिखा पाया गया।हू इज यू टी याने यु टी कौन है।यू टी इज मीन यानी यू टी बुरा है,शट अप।इसके साथ ही BJP Rocks, Fadnavis Rocks जैसे संदेश भी दीवार पर लिखा गया। @nikhildubei@abpmajhatv @abpnewshindi pic.twitter.com/IUdBbKMB4v
— renuchaudhary (@renucha72285460) December 28, 2019
शिवसेनेची सावध भूमिका
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना सगळं समजतं अशी प्रतिक्रिया, शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर भिंतींवर अशी वाक्य कुणी आणि का लिहिली, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
वर्षा बंगल्यातील व्हिडीओ कुणी शूट केला आणि तो बाहेर कसा आला याची माहिती अद्याप समोर आलेला नाही. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता राजकारण सुरु झालं आहे. दिविजाच्या रुममधील हा व्हिडीओ आहे, असं बोललं जात आहे. व्हिडीओबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही, मात्र त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.