PM Narendra Modi Road Show In Mumbai: PM नरेंद्र मोदींचा उद्या मुंबईत रोड शो; कोणते मार्ग बंद राहणार?, घराबाहेर पडण्याआधी नक्की पाहा...
PM Narendra Modi Road Show In Mumbai: मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
PM Narendra Modi Road Show In Mumbai: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Loksabha Election 2024) चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून पाचव्या टप्प्यात आता मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी 4-5 दिवसांचा अवधी उरला असून मुंबईत प्रचारांना वेग आला आहे.
मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या 15 मे आणि 17 मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. (PM Narendra Modi Road Show In Mumbai) यावेळी नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत मुंबईत रोड शो देखील करणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मार्ग बंद राहणार आहेत. याबाबत मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांनी माहिती दिली आहे.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो-
नरेंद्र मोदी यांचा उद्या (15 मे) मुंबईत रोड शो असल्यामुळे उद्या दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईच्या एल.बी.एस मार्ग बंद राहणार आहे. तसेच माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर.बी कदम जंक्शन पर्यंत उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण एल.बी.एस मार्ग व एल.बी.एस मार्ग ला जोडणारा मुख्य रस्त्या पासून 100 मीटर अंतरापर्यंत 14 आणि 15 तारखेला नो पार्किंग करण्यात आला आहे.
पुढील मार्गात तात्पुरता स्वरूपात बदल- (Temporarily change the route in mumbai)
-अंधेरी घाटकोपर मार्ग वरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतूक
-गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक
-हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक
नरेंद्र मोदींचा घाटकोपर- मुलुंड दौरा-
नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. जिथं विद्यमान खासदार मनोज कोटक यांना तिकिट नाकारून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. मिहिर कोटेचा यांची ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याशी कडवी लढत होणार आहे. त्यामुळे या रोड शोचा फायदा मिहिर कोटेचा यांना होऊ शकतो.
ईशान्य मुंबईत मराठी विरूद्ध गुजराती वाद-
बहुभाषिक असलेल्या ईशान्य मुंबईत पुर्नविकास, डोंगराळ झोपडपट्ट्या , आरोग्य असे अनेक मोठे प्रश्न असताना या विषयाला बगल देत, सध्या या मतदार संघात मराठी विरुद्ध गुजराती तर कुठे हिंदू मुस्लिम असा वाद रंगल्याचे पहायला मिळत आहे. या मतदार संघात गोवंडी सारख्या विभागात मुस्लिम मतदार जास्त असल्याने तिथे हिंदू- मुस्लिम वादाला हवा दिली जात आहे. मात्र या विभागातील जनता मात्र मूळ विषयांवर प्रकाश टाकताना दिसते. तर घाटकोपरमध्ये मराठी आणि गुजराती असे समसमान मतदार असल्याने इथे गुजराती विरुद्ध मराठी वाद पाहायला मिळत आहे. मात्र सामान्य नागरिकांना ही या वादावर पडदा पडावा अशी इच्छा आहे. त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल देऊन धार्मिक आणि प्रांतीय तेड निर्माण करून मतांचे राजकारण करू पाहणाऱ्यांना यावर विचार करणे गरजेचे आहे.