Maharashtra Corona Vaccination | मोफत लस देण्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय, महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही : देवेंद्र फडणवीस
'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आहेत प्रत्येक पात्र व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. तरीही मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मी बोलणार नाही," अशा शब्दात देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई : राज्यात मोफत कोरोना लस देण्याबाबत मंत्र्यांमध्ये मतभिन्नता असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "मोफत लसीकरणाबाबतची भूमिका पंतप्रधानांनी स्पष्ट केली आहे. तरीही मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, कुठलं धोरण आहे, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी बोलणार नाही," असं फडणवीस म्हणाले. तसंच लसीकरणाबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता हवी, असा सल्लाही त्यांनी दिला. मुंबईतील अंधेरीमध्ये कोविड केअर सेंटरचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यात सरसकट मोफत कोरोनाची लस द्यायची का याबाबत मंत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे. गरीब जनतेला लस मोफत देण्यात यावी याबाबत मंत्र्यांमध्ये एकमत आहे. पण ज्या वर्गाला पैसे देऊन लस घेता येईल त्यांनी ती विकत घ्यावी अशीही भूमिका काही मंत्र्यांनी मांडली आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लसीकरणासाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणाच केली होती. परंतु काही वेळाने आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचं ट्वीट डिलीट केले.
मोफत लसीकरणाविषयी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आहेत प्रत्येक पात्र व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. प्रत्येक भारतीयाकरता केंद्र सरकारने व्यवस्था केली आहे आणि त्यातून ही लस उपलब्ध होणार आहे. मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, कुठलं धोरण आहे, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी बोलणार नाही. पण पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे."
महाविकास आघाडीने एकवाक्यता ठेवायला : फडणवीस
"पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यात अजून नवी गोष्टी का येतात माहित नाही. त्यांनी सगळं समजून घेतलं पाहिजे. महाविकास आघाडीने एकवाक्यता ठेवायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात लसीकरण होणार आहे, त्यासाठी रणनीती तयार केली पाहिजे," असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
कांगावेखोरांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा, फडणवीसांचा टोला
"जे बोलघेवडे लोक आहेत, जे सातत्याने केंद्र सरकावर बोलतात त्यांना सांगू इच्छितो, इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजनचा कोटा महाराष्ट्राला दिला आहे. याशिवाय 1100 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर यापूर्वीच सरकारने दिले आहेत. तसंच आजही भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून इतर सामुग्री महाराष्ट्रात पोहोचवली जात आहे. कांगावेखोरांना माझी विनंती आहे की लोक दु:खात आहेत, या प्रसंगी केंद्र सरकार मदत करत आहे. राज्य सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा," असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मोफत लसीकरणाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा : बाळासाहेब थोरात
मोफत लसीबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरणाचा आग्रह धरला होता. या श्रेयवादाची लढाई सुरु आहे ती योग्य नाही. लसीकरणाबाबत चर्चा सुरु असून मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केला पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडलं. तसंच केवळ श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही, असा टोलाही लगावला.
"येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण होणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी वाढण्यासाठी शक्यात आहे. यामुळे गोंधळ होऊन कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. मी याबाबत मुख्य सचिवांसोबत चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसात धोरण निश्चित केलं जाईल. 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावेळी देखील गोंधळ झाला होता, त्यामुळे आता 18 वर्षवरील देताना धोरण ठरवावं लागेल," असंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.