(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी करा, चौकशी आयोगाकडे अर्ज
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी होण्याची गरजेचं असल्याचं डॉ. संजय लाखे पाटील यांनी याचिकेत म्हटलं आहे. या अर्जावर भीमा-कोरेगाव चौकशी आयोग उद्या सुनावणी करणार आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर उलट तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाकडे केली आहे. आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. मागील सरकारने भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची स्थापना केली होती.
डॉ. संजय लाखे पाटील यांनी या संदर्भात अनेक याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी एका याचिकेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्षीदार म्हणून उलट तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेत मांडलेली भूमिका आणि पुणे पोलिसांचा तपास यात विसंगती असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. चौकशी आयोग लाखे पाटील यांच्या अर्जावर बुधवारी (29 जानेवारी) निर्णय घेणार आहे.
मागील वर्षी विधानसभेत केलेल्या निवेदनात देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा इथला हिंसाचाराला हिंदुत्त्ववादी नेते संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि त्यांचे समर्थक जबाबदार असल्याचं मान्य केलं होतं. तसंच त्यांनी डाव्या विचारसरणीचे नेते किंवा शहरी नक्षलवादाचा कुठेही उल्लेख केला नव्हता, असं याचिकेत म्हटलं आहे. तत्कालीन भाजप सरकारने तपास करताना तसंच विचारवंत, प्राध्यापक, वकिलांना 'शहरी नक्षलवाद' अशी लेबलं लावताना खऱ्या गुन्हेगारांच्या भूमिकेकडे मात्र दुर्लक्ष केलं, असंही याचिकेत म्हटलं आहे.
कोरेगाव भीमा, वडू आणि सणसवाडी इथले फोन, मोबाईल रेकॉर्ड, पोलिस कंट्रोल रुमचे रेकॉर्ड्स, वायरलेस रेकॉर्ड तपासण्याची मागणीही डॉ. संजय लाखे पाटील याचिकेत केली आहे. तसंच दगडफेक आणि जाळपोळीमध्ये सहभागी असणाऱ्यांना स्थानिक पोलिसांनी संरक्षण दिल्याचा आरोपही डॉ. लाखे पाटील यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांचं निवेदन म्हणजे हिंदूत्त्ववादी नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारं आहे. हिंसाचारात भगवे झेंडे फडकावणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचं स्थानिक पोलिसांनी संरक्षण केलं, यावरही त्यांनी भाष्य केलं नाही. फडणवीस यांचं निवेदन आणि पोलिसांच्या तपासात विसंगती असल्याने त्यांना चौकशीसाठी बोलवणं गरजेचं आहे, असा डॉ. संजय लाखे पाटील यांनी याचिकेत म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
एल्गार परिषदेच्या तपासाची कागदपत्र देण्यास पुणे पोलिसांचा नकार
Bhima Koregaon | भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनासाठी गर्दी; अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना
एल्गार प्रकरणाचा तपास कुणाला तरी वाचवण्यासाठी एनआयएकडे; गृहमंत्री अनिल देशमुखांचा आरोप