मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या
Mumbai Builder Paras Shantilal Porwal Committed suicide : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या. भायखळा येथील इमारतीच्या 23व्या मजल्यावरुन उडी मारुन केली आत्महत्या.
Mumbai Builder Paras Shantilal Porwal Committed suicide : दक्षिण मुंबईतील (Mumbai News) प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल (Paras Shantilal Porwal) यांनी आत्महत्या केली आहे. भायखळा (Byculla) येथे ते राहत होते. त्याच इमारतीच्या 23व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचं रिडेव्हलपमेंट करणारे प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल (Paras Porwal) यांनी आज आत्महत्या केली आहे. भायखळा येथील राहत्या इमारतीच्या 23व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. सकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पारस पोरवाल यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
काळाचौकी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस शांतीलाल पोरवाल वय वर्षे 57 यांनी ते राहत असलेल्या इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. राहत्या घरातील जिमच्या बाल्कनीमधून त्यांनी उडी मारली. त्याच जिममध्ये एक सुसाईड नोट आढळून आली आहे. त्या नोटमध्ये, "माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसून कोणाचीही चौकशी करु नये", असा मजकूर लिहिलेला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
कोण आहेत पारस पोरवाल?
दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांपैकी एक म्हणजे, पारस शांतीलाल पोरवाल. दक्षिण मुंबईतील अनेक जुन्या इमारती आणि चाळींचं रिडेव्हलपमेंट त्यांनी केलं आहे. दक्षिण मुंबईतील मराठी माणसांची घरं रिडेव्हलपमेंट करणारे बांधकाम व्यावसायिक म्हणूनही ते प्रसिद्ध होते.
मुंबईतील 'सुविधा' शोरुमच्या संचालकाची आत्महत्या
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मुंबईतील दादर इथल्या सुविधा या प्रसिद्ध शोरुमचे संचालक कल्पेश मारु (वय 46 वर्षे) यांनी आत्महत्या केली होती. कल्पेश मारु यांचा मृतदेह विरार इथे आढळून आला होता. कल्पेश मारु हे 15 ऑगस्टपासून बेपत्ता होते. त्याबद्दल दादर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 18 ऑगस्ट रोजी विरारजवळील शिरसाड फाट्याजवळ पोलिसांना त्याचा मृतदेह आढळला. त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. कल्पेश हे सुविधा दुकानाचे मालक शांतीलाल मारु यांचे पुत्र होते.