'परमबीर सिंहांकडून दहशतवाद्यांना मदत, कसाबचा मोबाईल लपवला', निवृत्त एसीपींचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना फरार घोषित केलं आहे.अनेक आरोप असलेल्या परमबीर सिहांवर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना फरार घोषित केलं आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं आहे. अनेक आरोप असलेल्या परमबीर सिंहांवर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. हा आरोप केलाय मुंबईच्या एका निवृत्त एसीपीनं. निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर आरोप केला आहे की, सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती.
Parambir Singh : परमबीर सिंह 'फरार' घोषित, राज्य सरकारच्या याचिकेला न्यायालयाची मान्यता
पठाण यांनी एक तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात म्हटलं आहे की, त्यांना अशी शंका आहे की, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता.
अजमल कसाबचा मोबाईल सिंह यांनी चौकशीसाठी घेतला होता. त्यावेळी ते महाराष्ट्र ATS मध्ये कार्यरत होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे ट्रांसफ़र केली होती. त्यानंतर सिंह यांनी तो मोबाईल क्राईम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी केला आहे. पठाण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या मोबाईलवरुन या हल्ल्यावेळी कसाबसह अन्य दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हॅन्डलरशी संवाद करत होते. त्यानंतर त्यांनी मोठा हल्ला केला. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, असं पठाण यांनी म्हटलं आहे.
खंडणीसह अनेक आरोप असलेल्या परमबीर सिंह यांनी आता दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केला आहे. त्यामुळं आता परमबीर यांना शोधण्याचं मोठं आव्हान सरकारपुढं आहे.
पदावरुन बाजूला केलं जाणार?
परमबीर सिंह यांना आता फरार घोषित केल्यानंतर त्यांना पदावरून दूर केलं जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. ते आयपीएस अधिकारी असल्याने त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे आहे. पण राज्य केंद्राला तशा प्रकारची शिफारस करु शकते.