अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत प्रवेश घेण्यास एक दिवसाची मुदतवाढ
शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेले महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे.
मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली आणि 30 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित करायचे होते. मात्र अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे स्वतःची जातीचे प्रमाणपत्र नाही, अथवा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्या अभावी प्रवेशासाठी अडचणी येत होत्या. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेले महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे.
ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे, त्यांनी सदर प्रस्तावाची पोच (Acknowledgement) आणि सोबत वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास विद्यार्थी त्या प्रवर्गातून प्रवेशास पात्र असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःची जात प्रमाणपत्र तसेच प्रस्तावाची पोच (Acknowledgement) नाही त्यांनी वडिलांचे जात प्रमाणपत्र आणि हमीपत्र सादर केल्यास अशा विद्यार्थ्यांना त्या प्रवर्गातून प्रवेश मिळेल. मात्र दोन्ही बाबतीत प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी 30 दिवसांच्या आत स्वतःचे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील अन्यथा विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होईल.
ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळालेला आहे त्यांना जात प्रवर्ग बाबत कोणती कागदपत्रे सादर करण्यासाठी आवश्यकता नाही. याआधी मुंबई, पुणे, नाशिक ,अमरावती ,नागपूर, पिंपरी चिंचवड या पाच विभागांमध्ये ऑनलाईन पद्धतीने 11 वी प्रवेश प्रक्रिया पार पडत असताना पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत त्यांना 30 ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे होते.
इतर बातम्या