वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचा आधार हरपणार? लोकल प्रवेशबंदीमुळे वृद्धाश्रम सेवक अडचणीत
कोविड असूनही अनेक आरोग्य सेवक आणि सेविका या वृद्धांची सेवा करण्यासाठी हजर राहायच्या. आता मात्र त्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आल्याने आजी आजोबा चिंतेत आहेत.
ठाणे : लोकलने प्रवसाला सर्वसाधारण प्रवाशला निर्बंध आहेत. मात्र आरोग्य सेवकांप्रमाणेच काम करणाऱ्या वृद्धाश्रमातील सेवक सेविकांना देखील लोकलने यायची परवानगी नसल्याने वृध्दाश्रम कसे चालवायचे, वृध्द आजी आजोबांची काळजी कोण घेणार असे अनक प्रश्न वृध्दाश्रम चालकांना पडले आहेत.
कुमुदिनी पोतनीस या आजी मुलुंड मधील गोल्डन केयर वृद्धाश्रमात राहतात. तिथे असणारे सर्व वृद्धाश्रम सेवक त्यांची इतके दिवस खूप आपुलकीने काळजी घ्यायचे मात्र त्यांची दिवसरात्र सेवा करणारे आरोग्य सेवक कदाचित उद्यापासून कामावर येणार नाहीत. लोकलमध्ये त्यांना प्रवेश नसल्याने आज ही बिकट परिस्थिती निर्माण झालीय. मुंबईसारख्या शहरात अनेक वृध्दाश्रम आहेत. जिथे कोविड असूनही अनेक आरोग्य सेवक आणि सेविका या वृद्धांची सेवा करण्यासाठी हजर राहायच्या. आता मात्र त्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आल्याने आजी आजोबा चिंतेत आहेत.
गोल्डन केयरमध्ये काम करणाऱ्या निकिता राज बदलापूर वरुन तर वर्षा पवार डोंबिवली इथून मुलुंडला येतात. पण लोकल नसेल तर आम्ही रिक्षाने येऊ शकत नाही कारण पैसे जास्त खर्च होतात आणि बसने आलो तर ट्राफिक मुळे जास्त वेळ वाया जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अशातचं या आजी-आजोबांना वेळेत औषध, नाश्ता, जेवण दिले नाही तर त्यांचे हाल होतात, त्यामुळे आम्हाला लोकल प्रवास करू द्यावा, अशी मागणी त्या करत आहेत.
हॉस्पिटलमधील एखादी नर्स जी कामे करते ती सर्व कामे या सेविकांना करावीच लागतात. पण त्याहीपुढे जाऊन या आजी आजोबांच्या वैयक्तिक स्वच्छतेची सर्व कामे देखील याच सेविका करतात. गोल्डन केयरच्या संचालिका शमा मोरे सांगतात, या सेविकांशिवाय काम होणार नाही, आम्ही एकट्याने इतक्या आजी आजोबांना सांभाळू शकत नाही, वृद्धाश्रम सुरू ठेवायचे असेल तर या सेविका हव्या".
कोविडकाळ हा सर्वात भयानक काळ होता. मात्र अशा या काळात आजी आजोबांची तिन्ही वेळेस आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी याच सेविकांवर असायची. त्यांच्यापैकी काही दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांची देखील रोजची देखभाल याच करतात. "वृद्धाश्रमात असलेल्या सर्वांची नियमित पल्स चेक करणे, तापमान बघणे हे काम हेच सेवक करतात, यासोबत पॅरालिसिस, डिमेनशिया आजार ग्रस्तांची काळीजी देखील याच घेतात, त्यामुळे सरकारनं त्यांच्या मागणीचा लवकर विचार करावा", असे डॉ सुहेल लंबाते यांनी सांगितले.
या वृद्धाश्रम सेवकांची संख्या काही जास्त नाहीये. आता देखील अनेक प्रवासी तिकीट न काढता, फेक आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करतच आहेत. त्यामुळे गर्दी होतेच आहे. मग या वृद्धाश्रमातील गरजू सेवकांना सरकारने तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी या सेवकांसह आजी आजोबा देखील करत आहेत.